दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? सुनील तटकरेंनी एकाच वाक्यात विषय संपवला; कार्यकर्त्यांमध्ये खळबळ

On: February 2, 2026 1:39 PM
Sunil Tatkare
---Advertisement---

Sunil Tatkare | दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी थेट उत्तर देत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली असून पक्ष मजबूत आहे. नेता निवडीचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांचा आहे.” त्यामुळे आता तटकरेंच्या या वक्तव्यामुळे राज्यात सुरु असलेल्या तर्कवितर्कांना अखेरचा पूर्णविराम मिळाला आहे.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर कराड येथील प्रीतिसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं, त्यावेळी बोलताना तटकरे यांनी चव्हाण साहेबांच्या विचारांचा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दादांच्या नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करत राहणार आहे.

विलिनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका :

शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत वक्तव्य केल्यानंतर या मुद्द्यावर प्रतिक्रिया विचारली असता सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की, “विलिनीकरणाबाबत साहेबांनी जे काही म्हटलं आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, जनतेने विधानसभेत त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.”

तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, “प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बोलत असतो. मात्र, एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत राहण्याची आमची भूमिका ठाम आहे.”

Sunil Tatkare | “आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि राहणार” :

याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, या थेट प्रश्नावर सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, “आम्ही भाजपप्रणीत एनडीएमध्ये आहोत आणि सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देश गतिमान करण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली असून, ती दादांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचं आमचं कर्तव्य आहे.”

तसेच विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना तटकरे यांनी काँग्रेसवरही टीका करत म्हटलं की, “काँग्रेसचा महापौर कोणत्या गटाचा होणार, याची काळजी त्यांनी घ्यावी. नंतर आमच्याकडे पाहावं.” (NCP merger news)

दरम्यान आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सुनेत्रा पवार पुढाकार घेणार का, या प्रश्नावर तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट भूमिका घेत म्हटलं की, “दादा असल्यापासून आम्ही एनडीएमध्ये आहोत, म्हणजे भाजपसोबत सत्तेत आहोत. या निर्णयाला जे अनुकूल आहेत, त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा.” मात्र आता तटकरेंच्या या सर्व रोखठोक वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

News Title: Sunil Tatkare Rules Out NCP Merger Talks

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now