उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया! म्हणाल्या…

On: January 31, 2026 7:56 PM
Pune Guardian Minister
---Advertisement---

Sunetra Pawar | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. शपथविधीनंतर त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत दुःख, कर्तव्य आणि नव्या आशेचा संदेश दिला असून, दादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दुःखातही कर्तव्याची जाणीव :

राजभवनात (Raj Bhavan) पार पडलेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी काम करण्याचा मंत्र दिला होता. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या मूल्यांवर निष्ठा ठेवून उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून आले आहे, असे त्यांनी नमूद केले.

सुनेत्रा पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळल्याची भावना व्यक्त केली. मात्र त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हेच आपले खरे बळ असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन, असा शब्दही त्यांनी दिला.

Sunetra Pawar | जनतेच्या विश्वासावर पुढील वाटचाल :

या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेकडून मिळालेला प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच आपले सर्वात मोठे भांडवल असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे जाणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधी वाढवण्यासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी हेच आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले.

तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला बळ देणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधणे हे राज्य शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारीही आपण प्रामाणिकपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

News Title: Sunetra Pawar’s First Reaction

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now