Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत जलद हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज विधानभवनात झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. नियोजित वेळेनुसार दुपारी दोन वाजता ही बैठक पार पडली आणि कोणताही विरोध न होता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) यांनी सुनेत्रा पवार यांच्या गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला, तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सर्व आमदारांनी टाळ्यांच्या गजरात या प्रस्तावाला संमती दर्शवली. त्यामुळे नेतृत्व निवडीची प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण झाली.
बैठकीत नेमकं काय घडलं? :
बैठकीपूर्वी सुनेत्रा पवार काल रात्रीच बारामतीहून मुंबईला दाखल झाल्या होत्या. आज सकाळपासून त्यांनी देवगिरी निवासस्थानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर विधिमंडळात गटनेते निवडीसाठी बैठक झाली. सर्व आमदारांनी एकमताने त्यांच्या नावाला पाठिंबा दिल्याने कोणताही मतभेद न होता निर्णय घेण्यात आला. (Ajit Pawar death)
या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री आणि विधानसभा व विधानपरिषदेतील आमदार उपस्थित होते. नेतृत्वात सातत्य आणि स्थैर्य राखण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं मत बैठकीत व्यक्त करण्यात आलं.
Sunetra Pawar | आज सायंकाळी शपथविधी :
गटनेतेपदी औपचारिक निवड झाल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता राजभवनात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे.
अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे पर्व सुरू होत असल्याचं चित्र दिसत आहे.






