Sunetra Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव पुढे आल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेऊन हा प्रस्ताव मांडल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sunetra Pawar Deputy CM)
ही भेट मुख्यमंत्री निवासस्थानी पार पडली असून या बैठकीत प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) , छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा समावेश होता. बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत होत असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू असतानाच हा प्रस्ताव समोर आल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री भेटीनंतर वाढलेल्या चर्चांना वेग :
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे समजते. यासोबतच अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची खाती पुन्हा राष्ट्रवादीकडेच देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर लवकर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Sunetra Pawar Deputy CM)
या घडामोडींमुळे सत्ताधारी आघाडीत हालचाली वाढल्या असून, राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ही भेट केवळ औपचारिक नसून भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राज्यात मोठे निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Sunetra Pawar | पवार कुटुंबाकडून चर्चेनंतर निर्णय? :
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा आहे आणि अशा वेळी कोण पदावर बसेल यावर चर्चा करणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पवार कुटुंबीय एकत्र बसून यावर विचार करतील आणि त्यानंतरच योग्य निर्णय समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची इच्छा होती, असेही देशमुख यांनी नमूद केले. त्यांची ही इच्छा लक्षात घेऊन पुढील पावले टाकली गेली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे केवळ उपमुख्यमंत्रीपदापुरतेच नव्हे, तर राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबतही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.






