भावुक क्षण! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्वतःच दुःख बाजूला ठेवत घेतली विदीप जाधव कुटुंबाची भेट

On: February 2, 2026 4:20 PM
Sunetra Pawar News (1)
---Advertisement---

Sunetra Pawar | बारामती विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्या सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, विशेषतः जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पती, वडील आणि कुटुंबाचा आधार गमावलेल्या जाधव कुटुंबीयांच्या वेदना शब्दांत व्यक्त करणं कठीण झालं आहे. अशा कठीण क्षणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी स्वतःचं वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत जाधव कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला.

दादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी प्रथम कराड येथील प्रितीसंगममध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथे दिवंगत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केलं. या भेटीदरम्यान संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण होतं, मात्र सुनेत्रा पवार यांच्या शब्दांनी आणि कृतीनं जाधव कुटुंबीयांना मोठा आधार मिळाल्याचं पाहायला मिळालं.

“मी तुमच्यासोबत आहे…”, सुनेत्रा पवारांचा आधार :

विदीप जाधव (Vidip Jadhav) यांच्या पत्नी आणि मुलांच्या डोक्यावर मायेने हात ठेवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असे शब्द सुनेत्रा पवार यांनी दिले. पतीच्या निधनाने स्वतःवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांनी संयम राखत जाधव कुटुंबीयांचे दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.

विदीप जाधव हे अजित पवार यांचे दीर्घकाळ विश्वासू अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. दादांच्या सुरक्षेसाठी ते कायम तत्पर राहत असत. दुर्दैवाने, विमान दुर्घटनेत दोघांचाही एकाच वेळी मृत्यू झाल्यानं ही घटना अधिक हृदयद्रावक ठरली आहे. सुनेत्रा पवार यांनी या भेटीदरम्यान दादांच्या आठवणींनाही उजाळा देत, “विदीप हे केवळ सुरक्षारक्षक नव्हते, तर आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होते,” अशी भावना व्यक्त केली.

Sunetra Pawar | रोहित पवारांची भेट, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली :

दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही तरडगाव येथे जाधव कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केलं. “विदीप जाधव यांनी अनेक वर्षे अजितदादांचे अंगरक्षक म्हणून सेवा बजावली. दुर्दैवाने दोघांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या जाण्याने जसा संपूर्ण महाराष्ट्र शोकात आहे, तसाच विदीप जाधव यांच्या कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे,” असं त्यांनी म्हटलं.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचं जाहीर करत, या कठीण काळात कुटुंबासोबत सर्वजण उभे असल्याचा विश्वास दिला. त्यांच्या या निर्णयामुळे जाधव कुटुंबीयांना भविष्यासाठी थोडासा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे.

या साऱ्या घटनांमधून केवळ राजकीयच नव्हे, तर मानवी संवेदनशीलतेचं दर्शन घडलं असून, सुनेत्रा पवार यांच्या मायेच्या हातानं आणि नेत्यांच्या आधारानं जाधव कुटुंबीयांच्या दुःखात थोडीशी तरी ऊब निर्माण झाली आहे.

News Title: Sunetra Pawar consoles Vidip Jadhav family after Baramati plane crash, emotional moments remembered

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now