पवारांच्या घरची सून ते राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री! सुनेत्रा वहिनींचा थक्क करणारा राजकीय प्रवास

On: January 31, 2026 4:37 PM
Sunetra Pawar political Journey
---Advertisement---

Sunetra Pawar | अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगाने घडामोडी घडल्या. त्यानुसार विधानसभेत राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली असून त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आज शपथ घेतल्यानंतर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची संपूर्ण कारकीर्द जाणून घेऊयात.

समाजकारणातून नेतृत्वाची वाटचाल :

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या समाजकारण आणि राजकारणातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. ‘काकी’ या नावाने परिचित असलेल्या सुनेत्रा पवार या केवळ एका राजकीय घराण्यातील सून न राहता, त्यांनी स्वतःच्या कामातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्या मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील असून त्यांचे वडील पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना माहेरूनच मिळाले. 1985 मध्ये त्यांचा विवाह शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झाला. या दांपत्याला पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत.

अजित पवार राजकारणात सक्रिय असताना सुनेत्रा पवार यांनी बारामती आणि आसपासच्या परिसरातील सामाजिक कामांची धुरा सांभाळली. त्या बारामतीतील नामांकित शिक्षण संस्था ‘विद्या प्रतिष्ठान’च्या विश्वस्त आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलसंधारण यांसारख्या विषयांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला असून बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

राजकारणातील प्रवेश आणि पुढची वाटचाल :

दीर्घकाळ पडद्यामागून अजित पवारांच्या निवडणूक प्रचाराचे आणि मतदारसंघ व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी 2024 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातून निवडणूक लढवली, जी त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील मोठा टर्निंग पॉईंट ठरली. त्यानंतर त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होत्या. मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी त्यांनी आजच उप राष्ट्रपतींकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

सुनेत्रा पवार या शांत, संयमी आणि सौम्य स्वभावासाठी ओळखल्या जातात. सार्वजनिक कार्यक्रमांत त्या फारशा आक्रमक नसल्या तरी संघटन कौशल्यात त्या अत्यंत कुशल मानल्या जातात. ‘अजित पवारांची खंबीर साथ’ म्हणून त्यांची ओळख असली, तरी आता त्या स्वतः एक स्वतंत्र आणि प्रभावी राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत.

News Title: Sunetra Pawar Becomes Maharashtra’s First Woman Deputy CM – Full Political Journey

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now