Solar Eclipse 2026 | सूर्यग्रहण म्हटलं की लोकांमध्ये वेगळीच उत्सुकता निर्माण होते. ग्रहणाच्या काळात दिवसा काही क्षणांसाठी अंधार पसरतो, प्रकाश कमी होतो आणि वातावरणातही बदल जाणवतात. खगोलशास्त्राच्या दृष्टीने हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण या वेळी सूर्यासंबंधी अनेक निरीक्षणे आणि संशोधन केले जाते. यंदा 2026 मधील पहिले सूर्यग्रहण फेब्रुवारी महिन्यात दिसणार असून या घटनेची तयारी जगभर सुरू झाली आहे.
सूर्यग्रहणाच्या दरम्यान तापमानात थोडी घट जाणवते, पक्षी आणि प्राणी अस्वस्थ होतात, तसेच वातावरणात एक वेगळी शांतता पसरलेली दिसते. काही ठिकाणी काही सेकंद किंवा मिनिटांसाठी पूर्ण अंधारही होतो. त्यामुळे ही घटना सामान्य नागरिकांसाठीच नव्हे, तर शास्त्रज्ञांसाठीही विशेष महत्त्वाची मानली जाते.
फेब्रुवारीत वलयाकार सूर्यग्रहण :
2026 मधील पहिले सूर्यग्रहण मंगळवारी, 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. हे वलयाकार सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) असेल, ज्याला ‘रिंग ऑफ फायर’ असेही म्हटले जाते. या प्रकारात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, त्यामुळे सूर्याभोवती तेजस्वी वलय दिसते आणि मधोमध काळा गोलाकार भाग दिसतो. हा अनुभव पाहणाऱ्यांसाठी अत्यंत रोमांचक असतो.
नासाच्या माहितीनुसार, चंद्र पृथ्वीपासून थोड्या जास्त अंतरावर असताना सूर्यासमोर येतो, तेव्हा तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. त्यामुळे सूर्याच्या कडा उजळून दिसतात आणि आकाशात एक आगळंवेगळं दृश्य तयार होतं.
Solar Eclipse 2026 | भारतात दिसणार नाही ग्रहण :
मात्र, मिळालेल्या माहितीनुसार हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांना ‘रिंग ऑफ फायर’ थेट पाहता येणार नाही. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अटलांटिक महासागर आणि काही इतर भागांमध्ये स्पष्टपणे दिसणार आहे. त्या ठिकाणी काही मिनिटांसाठी दिवसा अंधाराचा अनुभव लोक घेऊ शकतील.
भारतात सूर्यग्रहणाच्या काळात सूतक पाळण्याची परंपरा आहे. ग्रहणानंतर घरातील वस्तू, कपडे आणि भांडी स्वच्छ करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. विज्ञान आणि परंपरा यांचा संगम या खगोलीय घटनेत पाहायला मिळतो.






