Solapur Municipal Corporation Election | राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आघाडी-बिघाडी, स्वबळाचे प्रयोग आणि उमेदवारांच्या चाचपण्या सुरू असतानाच सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी सातत्याने होत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात :
सध्या जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, याच कालावधीत सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या ऐतिहासिक यात्रेचे प्रमुख धार्मिक सोहळे पार पडतात. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी पुढे आली आहे. (Solapur Municipal Corporation Election)
श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा ही सोलापूरची सुमारे 900 वर्षांची अखंड परंपरा असून, दरवर्षी या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात. 14 ते 17 जानेवारी दरम्यान ही महायात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते. याच दरम्यान मतदान आणि मतमोजणी झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा मानकरी आणि आयोजकांनी दिला आहे.
Solapur Municipal Corporation Election | महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची औपचारिक मागणी :
या पार्श्वभूमीवर सिद्धरामेश्वर महाराज यात्रेचे नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देत महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची औपचारिक मागणी केली आहे. भाविकांची मोठी गर्दी, धार्मिक विधी आणि निवडणूक प्रक्रिया एकाच वेळी झाल्यास प्रशासनावर ताण येऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे आयोग यावर काय भूमिका घेणार, निवडणूक पुढे ढकलली जाणार की ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडणार, याकडे सोलापूरसह राज्याचे लक्ष लागले आहे.






