Gauri Palve Case | पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूनंतर प्रकरणाला नवे वळण मिळत आहे. कारण हे आत्महत्या प्रकरण म्हणून समोर आले असले तरी कुटुंबियांनी याला थेट हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही महिन्यांपूर्वीच गौरी आणि अनंत यांनी लग्न केले होते. सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचे नातेवाईक सांगतात. मात्र, घर बदलताना गौरीच्या हातात आलेल्या गर्भपाताच्या रिपोर्टने संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. त्या रिपोर्टमध्ये अनंत गर्जे याचेच नाव असल्याने दोघांमधील वाद तीव्र झाला. (Gauri Palve Case)
गौरीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतरही तिने पतीला माफ केले होते. पण अनंत गर्जे अद्याप त्या महिलेच्या संपर्कात असल्याचे समजताच वाद वाढले. या तणावातूनच तिने आत्महत्या केली अशी माहिती बाहेर आली. मात्र, आमची मुलगी मानसिकदृष्ट्या बलवान होती, ती कधीच असे पाऊल उचलणार नाही, असा दावा पालवे कुटुंब सातत्याने करत आहे. गौरीच्या मृत्यूनंतर अनंत गर्जेच (Anant Garje) तिला रुग्णालयात घेऊन गेला, पण काही वेळाने तो तेथून गायब झाला. यामुळे संशय अधिकच गडद झाला आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट; चौकशीचे आश्वासन मिळाल्याचा कुटुंबीयांचा दावा :
घटनेनंतर गौरीच्या आई–वडिलांनी अंजली दमानिया यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. आमचे प्रश्न, आमची वेदना आणि आमची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्टपणे मांडली असून त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्हाला साथ देऊ, असा विश्वासही त्यांच्याकडून व्यक्त झाल्याचे पालवे कुटुंब सांगते.
या बैठकीनंतर कुटुंबीयांच्या मनात काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला असून, सत्य बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री नक्की प्रयत्न करतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. प्रकरण गंभीर असल्याने याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.
Gauri Palve Case | आईचा संताप आणि वेदना :
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गौरीच्या आईने भावनाविवश होऊन मोठा खुलासा केला. “आमच्या मुलीमध्ये अपार सहनशक्ती होती. आम्ही तिला म्हटले की घरी ये, पण ती नाही म्हणाली. तिच्यात लढण्याची ताकद होती. ती अशा प्रकारे हार मानणारी नव्हती,” असे त्या म्हणाल्या. आमचे लेकरू स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची. तिने आम्हाला किंवा इतर कोणालाही काही सांगूच दिले नाही. ही वेदना शब्दात सांगणे कठीण असल्याचे त्या म्हणाल्या. (Gauri Palve Case)
त्या पुढे म्हणाल्या, “मागचे काही काढून काय उपयोग? आता पुढे न्याय मिळवण्यासाठी काय करायचे, यावरच आम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे.” कुटुंबीयांचा आरोप आणि आईची ही विधानं प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनवत आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होईपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरितच आहेत.






