Saksham Tate Murder Case | नांदेडमधील आंतरजातीय प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या सक्षम ताटे हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या भीषण ऑनर किलिंग प्रकरणाबाबत आता राष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून लोकसभेत याचा प्रतिध्वनी उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. पीडितांच्या न्यायासाठी या घटनेत नवी घडामोड समोर आली आहे. (Aachal Mamidwar)
लोकसभेत मुद्दा उपस्थित होणार :
नांदेडमध्ये घडलेल्या 19 वर्षीय सक्षम ताटे (Saksham Tate) हत्याकांडाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आंतरजातीय प्रेमसंबंध मान्य नसल्यामुळे आचल मामीडवारचे वडील आणि भाऊ यांनी त्याच्यावर गोळ्या झाडून आणि नंतर दगडाने डोक्यावर वार करून त्याची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. या धक्कादायक घटनेनंतर आचलने सर्वांसमोर सक्षमच्या मृतदेहाशी विवाह करून न्यायाची मागणी केली होती. तिच्या मते, तिचे वडील गजानन आणि भाऊ हिमेश व साहिल यांनी हा निर्घृण कृत्य केल्याचे तिने पोलीसांसमोर स्पष्ट सांगितले आहे. (Saksham Tate Murder Case)
या घटनेची गंभीर दखल घेऊन खासदार चंद्रशेखर आझाद यांनी प्रकरण लोकसभेत उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज सक्षमच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधणार असून संपूर्ण घटनेचा तपशील जाणून घेणार आहेत. त्यानंतर ते संसदेत या ऑनर किलिंग प्रकरणावर प्रश्न उपस्थित करणार असून त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची चर्चा होणार आहे. सक्षमच्या परिवाराने दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी केली असून कुटुंबाच्या न्यायलढ्याला आता लोकसभेचा आधार मिळणार असल्याचे चित्र आहे.
Saksham Tate Murder Case | तीन वर्षांचे प्रेम आणि कुटुंबीयांचा विरोध :
सक्षम ताटे आणि आचल मामीडवार (Aachal Mamidwar) या दोघांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सक्षम हा आचलच्या भावाचा मित्र असल्याने त्यांची ओळख झाली आणि त्यातून मैत्री प्रेमात बदलली. मात्र ते वेगळ्या जातीचे असल्याने आचलच्या कुटुंबीयांनी हे नाते मान्य करण्यास नकार दिला होता. कुटुंबीयांनी वेळोवेळी त्यांना एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले; मात्र दोघांनीही आपले नाते कायम ठेवले. (Saksham Tate Murder Case)
सक्षमच्या (Saksham) मृत्यूनंतरही आचलने त्याच्यावरील आपले प्रेम सोडले नाही. तिने सार्वजनिकरित्या त्याच्या पार्थिवावर हळद-कुंकू लावून, मंगळसूत्र घालून त्याच्याशी विवाह केला. “त्याने मला कधीच सोडले नाही, मग मी त्याला कसा सोडू?” असे सांगत तिने सक्षमच्या घरच्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. सक्षमच्या आईनेही आचलला मुलगी नव्हे तर ‘माझा सक्षम’ म्हणून स्वीकारण्याचे जाहीरपणे सांगितले असून या कुटुंबाच्या वेदनेला न्याय मिळावा, अशी सर्वत्र मागणी होत आहे.






