Maharashtra Politics | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण करणारी माहिती समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीनंतर आता जागावाटपाचा पहिला संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून, विशेषतः नाशिक महापालिका निवडणुकीत या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. मात्र यावेळी तिन्ही नेत्यांनी जागावाटपावर स्पष्ट भूमिका मांडण्याचे टाळले होते. असे असतानाच आता नाशिक महापालिकेतील जागावाटपाचा संभाव्य आकडा समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिक महापालिकेसाठी ठाकरे बंधूंचा संभाव्य फॉर्म्युला :
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 50 जागा मनसेकडे आणि 72 जागा शिवसेना (उबाठा) कडे राहणार असल्याची चर्चा आहे. युतीची घोषणा झाल्यानंतर नाशिक शहरातील मनसे कार्यालयात शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे जल्लोष साजरा केला होता. त्याचवेळी जागावाटपातील आकडे समोर आल्याने ठाकरे बंधूंच्या युतीची ताकद किती वाढणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मनसेची नाशिक महापालिकेवर कधीकाळी असलेली सत्ता आणि त्या काळात झालेली विकासकामे हे यंदाच्या निवडणुकीत पक्षासाठी मोठे भांडवल ठरू शकते. तर दुसरीकडे नाशिक हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला असल्याने, या शहरात ठाकरे बंधूंची युती नव्याने उभी राहत नाही, तर जुन्या राजकीय समीकरणांना नवे स्वरूप मिळत असल्याचे चित्र आहे.
Maharashtra Politics | भाजप व महायुतीसमोर अडचणी वाढण्याची शक्यता :
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे नाशिकमध्ये महायुतीसमोर मात्र अडचणी वाढताना दिसत आहेत. नाशिक महापालिकेच्या 122 जागांपैकी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून 40 ते 45, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 20 ते 25 जागांची मागणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे भाजपकडे मागील निवडणुकीतील तब्बल 66 नगरसेवक होते, तसेच अलीकडच्या काळात अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपकडे एकूण 122 जागांसाठी जवळपास एक हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज केल्याची चर्चा आहे. त्यामुळे जागावाटप करताना भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर काही नेत्यांचा स्वबळावर लढण्याचा कल असल्याचे बोलले जात असताना, राज्य पातळीवरून मात्र महायुती टिकवण्याच्या सूचना दिल्या जात असल्याची माहिती मिळत आहे.
नाशिकमध्ये राजकीय लढत अधिक रंगणार :
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, तर दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत जागावाटपावरून तणाव वाढताना दिसत आहे. नाशिक महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता, आगामी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचा हा पहिला जागावाटपाचा फॉर्म्युला प्रत्यक्ष निवडणुकीत किती प्रभावी ठरतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






