Sharad Pawar | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. या शपथविधीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिली असून, त्यांची भूमिका आता समोर आली आहे.
विमान अपघातानंतर राजकीय हालचाली :
मुंबईहून बारामतीकडे प्रचारासाठी निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत विमानातील कोणतीही व्यक्ती वाचू शकली नाही आणि अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेबाबत संशयही व्यक्त केला जात असून, अजित पवार आता आपल्यात नाहीत यावर अनेकांना अजूनही विश्वास बसत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) मधील दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे दावे समोर आले. शरद पवार यांनी स्वतः सांगितले की, अजित पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात पक्ष एकत्र येण्यावर चर्चा झाली होती. मात्र, अजित पवार गटाच्या नेत्यांनी अशा कोणत्याही चर्चेचे खंडन करत, अजित पवार यांनी यासंदर्भात आमच्याशी काहीही बोलले नसल्याचे स्पष्ट केले.
Sharad Pawar | सुनेत्रा पवारांचा शपथविधी आणि शरद पवारांची भूमिका :
अजित पवार (Ajit pawar) यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घडामोडीमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आणि पवार कुटुंबातील मतभेदही उघडपणे समोर आल्याचे दिसून आले. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणार असल्याची कोणतीही माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, असे शरद पवार यांनी आधीच सूचित केले होते.
यानंतर नुकताच माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मला याबद्दल काहीही बोलायचे नाही.” त्यामुळे त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळल्याचे स्पष्ट झाले. याच संवादात त्यांनी भारत-चीन सीमेवरील (India-China Border) परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आणि या मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक होते, असे मत मांडले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या विषयावर संसदेत भाष्य केल्यानंतर निर्माण झालेल्या गदारोळावरही त्यांनी आपली भूमिका मांडली.






