Sharad Pawar | आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला सलग धक्के बसत असल्याचं चित्र दिसत आहे. पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही शरद पवार (Sharad Pawar) गटातील महत्त्वाच्या नेत्यांनी पक्ष सोडल्याने अंतर्गत अस्वस्थता वाढली आहे. अजित पवार (ajit pawar) गटासोबत संभाव्य युतीच्या चर्चेमुळे नाराजीचा सूर अधिक तीव्र झाल्याचं स्पष्ट होत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असताना, या निर्णयाला शरद पवार गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांसोबत आघाडी नको, अशी ठाम भूमिका घेत शरद पवार गटातील बडे नेते प्रशांत जगताप यांनी पक्षाला तडकाफडकी रामराम ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच पक्षासाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे.
अजित पवार गटासोबत युतीला विरोध; प्रशांत जगतापांचा राजीनामा :
प्रशांत जगताप यांनी यापूर्वीच दादांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यास उघडपणे विरोध दर्शवला होता. अखेर त्यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पुण्यात राजकीय खळबळ उडाली आहे. जगताप यांनी विधानसभा निवडणूकही लढवलेली असल्याने त्यांच्या राजीनाम्याला राजकीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व दिलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत जगताप लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे शरद पवार गटातील इतर नाराज नेत्यांनाही बळ मिळाल्याचं बोललं जात असून येत्या काही दिवसांत आणखी हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sharad Pawar | पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक; राहुल कलाटेंचा पक्षप्रवेश :
पिंपरी-चिंचवडमध्येही शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले राहुल कलाटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
राहुल कलाटे यांनी 2025 च्या विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ते शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते म्हणून ओळखले जात होते. मात्र आता त्यांनी शरद पवार गटाची साथ सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शरद पवार गटात आऊटगोइंग सुरू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
निवडणुकीआधीच दुहेरी धक्का, पक्षात चिंतेचं वातावरण :
आधी प्रशांत जगताप यांचा राजीनामा आणि त्यानंतर राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश, या दोन घडामोडींमुळे शरद पवार गटाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दुहेरी नुकसान सहन करावं लागत आहे.
महापालिका निवडणूक अगदी तोंडावर असताना प्रमुख नेत्यांची पक्षातून बाहेर पडण्याची मालिका सुरू राहिल्यास याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.






