सक्षम ताटे प्रकरणात आचलने केलेली मागणी पोलिसांनी केली मान्य; नेमकी मागणी काय?

On: December 6, 2025 3:40 PM
Saksham Tate Case
---Advertisement---

Saksham Tate Case | नांदेडमध्ये प्रेमसंबंधातून झालेल्या सक्षम ताटेच्या हत्येनंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. सक्षमचा मृतदेह हातात धरून विधी करणाऱ्या आचल मामीडवार हिने केलेली संरक्षणाची मागणी अखेर प्रशासनाने मान्य केली असून, ताटे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कायमस्वरूपी पहारा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रेमप्रकरणातून सक्षमची निर्दयी हत्या :

नांदेड(Nanded) येथील सक्षम ताटे हा केवळ 20 वर्षांचा तरुण गेली तीन वर्षे आचल मामीडवारसोबत प्रेमसंबंधात होता. मात्र आचलच्या कुटुंबीयांना हा संबंध अजिबात मान्य नव्हता. तिच्या भावाने सक्षमला स्पष्टपणे दूर राहण्याची ताकीद दिली होती. दोन्ही कुटुंबांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तणाव अधिक वाढला होता. सक्षमवर अनेक गुन्हे दाखल होते आणि त्याच्यावर तडीपारीची कारवाईही झाली होती, तर आचलच्या वडिलांवर आणि भावांवर देखील काही गुन्हे होते.

सक्षम जेलमधून बाहेर आल्यानंतरच त्याच्याविरोधात कट रचला गेल्याची माहिती समोर आली. हत्येच्या काही क्षण आधी आचलची आई सक्षमच्या घरावर पोहोचली होती आणि त्याच्या कुटुंबाला धमकी दिली होती. त्यानंतर आचलचे दोन भाऊ सक्षमला बाहेर भेटले, गोड बोलून त्याला सोबत नेले आणि त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत तो पळण्याचा प्रयत्न करीत असताना फरशीत पाय अडकल्याने तो खाली पडला. त्याच फरशीचा वापर करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. आचल मात्र या सर्व घडामोडींविषयी अज्ञात होती कारण तिला त्याच दिवशी देवदर्शनास जाण्याच्या बहाण्याने मामाच्या घरी नेण्यात आले होते.

Saksham Tate Case | आचलने केलेली मोठी मागणी प्रशासनाने केली मान्य :

सक्षमच्या (Saksham Tate Case) मृत्यूची माहिती आचलला वर्तमानपत्रातील छायाचित्रांवरून मिळाली. त्यानंतर ती थेट पोलिस ठाण्यात पोहोचली आणि सक्षमच्या घरी येण्याची परवानगी मागितली. तिने मृतदेहासमोरच विवाहविधी केले आणि आयुष्यभर सक्षमची पत्नी म्हणून राहणार असल्याचे सांगत सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली होती.

घटनेनंतर आचलने प्रशासनासमोर सक्षमच्या कुटुंबासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली. तिचा अल्पवयीन भाऊ बाहेर आल्यावर ताटे कुटुंबाला धोका पोहोचवू शकतो, असे सांगत तिने सुरक्षेची विनंती केली होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली असून संघसेननगर येथील सक्षमच्या निवासस्थानी सहा शस्त्रधारी पोलीस कर्मचारी 24 तास तैनात राहणार आहेत. या निर्णयानंतर ताटे कुटुंबाला तातडीचे संरक्षण मिळाले असून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

News Title: Security Granted After Saksham Tate Murder

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now