Samruddhi Highway | समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत गॅन्ट्री उभारणीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे ठराविक कालावधीत वाहतुकीवर परिणाम होणार आहे. प्रशासनाने नागरिकांना प्रवासापूर्वी योग्य नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे. (MSRDC megablock)
हे काम 27 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे काही वेळांसाठी महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली जाणार आहे.
कुठे आणि कधी होणार काम? :
समृद्धी महामार्गावरील किमी 90+500 ते किमी 170+400 या दरम्यान गॅन्ट्री उभारणीचं काम करण्यात येणार आहे. यात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुके तसेच वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्याचा समावेश आहे. (Samruddhi Highway traffic update)
MSRDC च्या माहितीनुसार, हे काम एकूण 12 टप्प्यांमध्ये होणार असून, प्रत्येक टप्प्यात एका बाजूची वाहतूक 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई किंवा नागपूर दिशेकडील वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी वेळेची योग्य आखणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Samruddhi Highway | प्रवाशांसाठी आवाहन आणि पर्यायी व्यवस्था :
या कामामुळे धामणगाव (Dhamngaon Railway) रेल्वे तालुक्यातील पठाणपूर, चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा व खंबाळा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू नटवा, पाचोड व वाढोना रामनाथ तसेच कारंजा (लाड) तालुक्यातील निंबा जहागीर व धानोरा ताथोड या भागांमध्ये वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे. (Samruddhi Highway traffic update)
प्रवासादरम्यान संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि घरातून निघण्यापूर्वी वाहतूक वेळापत्रक तपासावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. दीर्घकालीन दृष्टीने ही प्रणाली महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करेल, असा विश्वास MSRDC ने व्यक्त केला आहे.






