पानसरे हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण; मुख्य आरोपी समीर गायकवाडचा हृदयविकाराने मृत्यू!

On: January 20, 2026 10:41 AM
Sameer Gaikwad Death
---Advertisement---

Sameer Gaikwad Death | कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा आज (20 जानेवारी) सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याचा जीव वाचवता आला नाही. (Govind Pansare murder case)

समीर गायकवाड हा गेल्या चार वर्षांपासून जामिनावर बाहेर होता आणि सांगलीतील विकास चौक परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होता. त्याच्या अचानक निधनामुळे कुटुंबीयांसह परिसरातही शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर पानसरे हत्याप्रकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

समीर गायकवाडचा मृत्यू कसा झाला? :

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अचानक समीर गायकवाड याला छातीत तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यानंतर त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच आज पहाटे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकार आल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच गायकवाड यांच्या निवासस्थानी नातेवाईक आणि परिचितांची गर्दी जमली होती. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात शोकमय वातावरण आहे.

Sameer Gaikwad Death | गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा आढावा :

कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare murder case) हे ज्येष्ठ डाव्या विचारांचे नेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते होते. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये मॉर्निंग वॉकहून परतताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, तर त्यांची पत्नी उमाताई पानसरे यांनाही दुखापत झाली होती. उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2015 रोजी पानसरे यांचे निधन झाले होते. (Sameer Gaikwad Death)

या प्रकरणाच्या तपासादरम्यान समीर गायकवाडसह डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांच्यासह अन्य संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 2022 मध्ये या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला होता, तर 9 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने दहा संशयितांवर हत्येचा कट आणि हत्या केल्याचे आरोप निश्चित केले होते. सध्या या प्रकरणातील सर्वच आरोपी जामिनावर बाहेर होते.

News Title: Sameer Gaikwad, Accused in Govind Pansare Murder Case, Dies of Heart Attack in Sangli

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now