Maharashtra Politics | महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाला राज्यभरात मोठं यश मिळालं असून भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे, एमआयएमनेही अनेक ठिकाणी दमदार कामगिरी करत आपली ताकद वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी थेट दावा करत सांगितलं आहे की, मालेगावमध्ये महापौर निवडण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वतीने स्थानिक नेत्यांना युतीचा प्रस्ताव देण्यात आला होता. या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नेमकं काय म्हणाले इम्तियाज जलील? :
इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले की, “मालेगावसारख्या ठिकाणी आमचे 21 नगरसेवक निवडून आले आहेत. तिथे महापौर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांकडून स्थानिक पातळीवर प्रस्ताव आला होता की आपण सोबत येऊ शकता का.” मात्र, आमच्या स्थानिक आमदारांनी ठामपणे भाजप किंवा शिवसेना शिंदे गटासोबत जाण्यास नकार दिला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या दाव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला असून, शिंदे गटाकडून एमआयएमशी संभाव्य युतीचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप यावर शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
Maharashtra Politics | महापालिकांतील सत्तास्थापनेवर परिणाम? :
जलील पुढे म्हणाले की, राज्यातील तीन ते चार महापालिकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेगवेगळे पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही “सन्मानाने पाठिंबा मागितला तर आम्ही त्यावर सकारात्मक विचार करू,” असं स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, नोटा उधळण्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, तो जल्लोषाचा कार्यक्रम होता आणि काही उत्साही लोकांनी पैसे उधळले. त्यात कोणताही गुन्हेगारी प्रकार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एकूणच, या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






