Saksham Tate Murder Case | राज्यात गाजलेल्या सक्षम ताटे हत्या प्रकरणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तपासाबाबत असमाधान व्यक्त करत सक्षम ताटेची आई आणि त्याची प्रेयसी आचल मामीडवार (Achal Mamidwar) यांनी थेट टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे एकच खळबळ उडाली. (Saksham Tate Murder Case)
सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सक्षम ताटेच्या (aksham Tate) कुटुंबीयांचा आणि पोलिसांचा वादही यावेळी पाहायला मिळाला. या संपूर्ण घटनेमुळे पोलीस तपासावर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप :
नांदेड शहरातील जुनागंज भागात 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप असून आचल मामीडवारचे वडील आणि भावांसह काही सहकारी या गुन्ह्यात आरोपी आहेत. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोलिसांनी योग्य भूमिका घेतली नाही, असा आरोप आता करण्यात येत आहे.
आचल मामीडवार आणि सक्षम ताटेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, घटनेच्या दिवशी इतवारा पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी आचलच्या अल्पवयीन भावाला सक्षमची हत्या करण्यास परावृत्त केल्याचा गंभीर प्रकार घडला. सक्षमला आधी संपवा आणि नंतर पोलीस ठाण्यात या, असे शब्द वापरल्याचा आरोप आचलने केला आहे. या आरोपांमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
Saksham Tate Murder Case | कारवाई न झाल्याने टोकाचा निर्णय, प्रशासनावर दबाव वाढला :
या प्रकरणातील संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, यासाठी सक्षम ताटेच्या कुटुंबीयांनी आणि आचल मामीडवारने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले होते. कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही याआधीच देण्यात आला होता. मात्र अनेक दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर हा टोकाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडलेल्या घटनेनंतर प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. सक्षम ताटे प्रकरणात आता पुढे काय कारवाई होते, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर चौकशी होते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या घटनेनंतर सक्षमच्या आईने आणि आचल मामीडवारने आजच न्याय न मिळाल्यास पुन्हा टोकाचं पाऊल उचलण्याचा इशाराही दिला आहे, त्यामुळे प्रशासनासाठी ही बाब अत्यंत संवेदनशील ठरली आहे.






