Saina Nehwal Divorce | भारतीय बॅडमिंटनमधील एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जाणारं सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचं वैवाहिक नातं अखेर संपुष्टात आलं आहे. सायना नेहवाल हिने स्वतःच्या सोशल मीडियावरून घटस्फोटाची माहिती जाहीर करताना एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 7 वर्षांच्या वैवाहिक सहजीवनानंतर दोघांनी परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं तिने नमूद केलं आहे. (Saina Nehwal Divorce)
सायनाने लिहिलेल्या पोस्टमध्ये, “आयुष्य कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जातं. खूप विचारांती आम्ही दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या मानसिक शांतीला आणि व्यक्तिगत विकासाला प्राधान्य देत आहोत,” असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं असून सोशल मीडियावर तिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
सात वर्षांचं नातं संपलं, पण आदर कायम :
सायनाने आपल्या पोस्टमध्ये असंही म्हटलं आहे की, “आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल मी कृतज्ञ आहे. यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करा.” या वाक्यांनी चाहत्यांच्या मनात सहानुभूती आणि आदराचं स्थान निर्माण केलं आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता सोशल मीडियावर जोर चढला आहे.
View this post on Instagram
सायना आणि कश्यप यांनी डिसेंबर 2018 मध्ये विवाह केला होता. दोघांची ओळख आणि मैत्री हैदराबादच्या पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत झाली होती. त्याच मैत्रीचं पुढे रूपांतर प्रेमात आणि मग विवाहात झालं. त्यांचा संसार बऱ्याच काळापर्यंत एक आदर्श म्हणून पाहिला जात होता.
Saina Nehwal Divorce | सायना-कश्यप: एक यशस्वी खेळाडू जोडपं :
सायना नेहवाल ही भारतासाठी ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली महिला बॅडमिंटनपटू असून, तिने जागतिक क्रमवारीतही अव्वल स्थान मिळवलं आहे. BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सायनाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दुसरीकडे, पारुपल्ली कश्यपने 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारतीय बॅडमिंटनमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. (Saina Nehwal Divorce)
2024 च्या सुरुवातीला कश्यपने बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली होती. तर 35 वर्षीय सायना गेल्या वर्षभरापासून कोर्टपासून दूर आहे. 2023 मध्ये सिंगापूर ओपनमध्ये झालेल्या पराभवानंतर तिने कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही. एका पॉडकास्टमध्ये तिने तिच्या संधिवाताच्या त्रासामुळे निवृत्तीचा विचार सुरू असल्याचं सांगितलं होतं.
संपलं नातं, पण प्रेरणा कायम :
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचं नातं संपलं असलं, तरी दोघांनीही भारतीय बॅडमिंटनसाठी दिलेली सेवा आणि त्यांच्या खेळातील योगदानाला विसरता येणार नाही. हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले असले, तरी त्यांनी परस्पर आदर आणि समजूतदारपणाने ही गोष्ट हाताळल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं. (Saina Nehwal and Parupalli Kashyap Divorce)
सायनाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून अनेक खेळप्रेमी, चाहते आणि सहकारी खेळाडू तिच्या निर्णयाचा आदर करत आहेत. आगामी काळात सायना आणि कश्यप दोघांनाही त्यांच्या आयुष्यात नवी सुरुवात मिळो, हीच शुभेच्छा.






