Sanjay Raut | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बारामतीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर राजकीय वातावरणही तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला असून त्यांनी थेट भाजपावर टीका करत मोठी मागणी केली आहे.
अपघातानंतर श्रद्धांजली आणि राजकीय प्रतिक्रिया
28 जानेवारी रोजी बारामती दौऱ्यावर असताना अजित पवार यांचे विमान लँडिंगदरम्यान अपघातग्रस्त झाले आणि या दुर्घटनेत त्यांच्यासह इतरांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांचा सुरक्षारक्षक, दोन वैमानिक आणि एका फ्लाइट अटेंडंटचा समावेश होता. या घटनेनंतर बारामतीत झालेल्या अंत्यसंस्कारासाठी राज्यभरातून हजारो नागरिक जमले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच अनेक आमदार, खासदार आणि मंत्री या वेळी उपस्थित होते.
अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि समर्थक आपल्या गावी परतले असतानाच, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिली. त्यांनी भाजपावर सडकून टीका करत अजित पवार यांच्याशी संबंधित जुन्या आरोपांबाबत मोठी मागणी मांडली आहे.
Sanjay Raut | 70 हजार कोटींचे आरोप मागे घेण्याची मागणी :
संजय राऊत यांनी आपल्या एक्स (X) खात्यावर केलेल्या पोस्टमध्ये भाजपाने अजित पवार यांच्या निधनानंतर 29 जानेवारी रोजी बहुसंख्य मराठी वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती देत श्रद्धांजली अर्पण केल्याचा उल्लेख केला. या जाहिरातींवर टीका करत त्यांनी, “भाजपाने दादांना श्रद्धांजली देण्यासाठी मोठ्या जाहिराती दिल्या, पण त्याचा उपयोग काय?” असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की, अजित पवार यांच्यावर करण्यात आलेले 70 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप मागे घेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
राऊत यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, भाजपाकडून, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अजित पवार यांच्यावर केलेले 70 हजार कोटींचे आरोप मागे घेतले पाहिजेत. त्यांच्या मते, हे आरोप मागे घेणं म्हणजेच दिवंगत नेत्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा योग्य मार्ग ठरेल. दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, भाजपाचे नेते यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






