Ration Card News | रेशन कार्डधारकांसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाचा बदल होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Anna Yojana) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या धान्याच्या प्रमाणात पुन्हा एकदा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सध्या लागू असलेल्या तात्पुरत्या नियतनात बदल करून पूर्वीचेच धान्य वाटपाचे प्रमाण पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या गव्हाचा साठा कमी असल्याने तांदळाचे प्रमाण वाढवून गहू कमी करण्यात आला होता. मात्र आता अन्नधान्य साठा आणि वितरणात समतोल राखण्यासाठी पुन्हा जुने प्रमाण लागू केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Ration Card January 2026 Update)
सध्या किती धान्य मिळणार? :
डिसेंबर 2025 या महिन्यासाठी धान्य वाटपाच्या प्रमाणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रती कार्ड 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू दिला जात आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू या प्रमाणात धान्य वाटप सुरू आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की डिसेंबर महिन्यातील धान्य वाटप हे याच सध्याच्या प्रमाणानुसारच केले जाईल. त्यामुळे डिसेंबरमध्ये रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांनी कोणत्याही बदलाबाबत संभ्रमात पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Ration Card News | 1 जानेवारी 2026 पासून काय बदल होणार? :
1 जानेवारी 2026 पासून अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी धान्य वाटपाचे प्रमाण बदलणार आहे. त्यानुसार, अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रती कार्ड 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू दिला जाणार आहे. म्हणजेच तांदळाचे प्रमाण 5 किलोने कमी होईल, तर गव्हाचे प्रमाण 5 किलोने वाढणार आहे. (Antyodaya Anna Yojana)
त्याचप्रमाणे प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांसाठीही बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार, प्रति सदस्य 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू या प्रमाणात धान्य वाटप केले जाणार आहे. म्हणजेच जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा पूर्वीचे जुने नियतन प्रमाण लागू होणार आहे. (Ration Card News)
तांदळाचे प्रमाण वाढवून गहू कमी करण्यामागे केंद्र व राज्य पातळीवरील पुरवठा सुलभ करणे हा उद्देश होता. मात्र, आता अन्नधान्य साठा व्यवस्थापन अधिक स्थिर झाल्याने पुन्हा संतुलित प्रमाण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे नव्या वर्षापासून लाखो रेशन कार्डधारकांच्या मासिक धान्य नियतनात बदल होणार असून, लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.





