Maharashtra | कल्याण येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि RPI अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी रिकाम्या खुर्च्या पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणुका तोंडावर असताना कार्यकर्त्यांची अनुपस्थिती पक्षाच्या ताकदीवर परिणाम करणारी ठरेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात आठवले म्हणाले की, पक्षाची शाखा मजबूत असणे आणि मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रपक्षांकडून तिकीट मिळवायचे असेल, तर शाखा सक्रिय राहायला हव्यात. सभेत रिकाम्या खुर्च्या दिसल्या तर कोण देणार तिकीट, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटन मजबूत करण्याचे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
“खुर्च्या रिकाम्या असतील तर कोण तिकीट देणार?” आठवलेंचा प्रश्न :
मेळाव्यात बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या भागात शाखा आहे ती शाखा जागृत असली पाहिजे. वस्ती-वस्तीत कार्यकर्ते पोहोचले नाहीत, तर पक्षाची ताकद कशी दिसणार? इतर पक्ष दुपारी सभा घेत असतानाही RPI ने मेळाव्याची वेळ कामगार वर्ग लक्षात घेऊन ठेवली, परंतु तरीही अपेक्षित उपस्थिती न दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मित्रपक्षांना आपली ताकद दाखवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांना सभेला आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी सांगितले की RPI चा समाज मोठ्या प्रमाणात काम करणारा आहे, त्यामुळे वेळ योग्य असूनही मेळाव्यांना प्रतिसाद न मिळाल्यास भविष्यात तिकीट मिळवणे कठीण होईल. शाखा मजबूत ठेवण्याचे आणि स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवण्याचेही आवाहन त्यांनी केले.
Maharashtra | “आपला गट ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते” — आठवले :
यावेळी आठवले यांनी RPI ची राजकीय ताकदही कार्यकर्त्यांना समजावून सांगितली. त्यांनी दावा केला की आपला गट ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो. 1990 पासून काँग्रेससोबत गेल्यावर त्यांना सत्ता मिळाली, तर भाजप-शिवसेनेसह गेल्यावर देखील ते सत्तेत आले, असे त्यांनी उदाहरण देऊन सांगितले. (RPI meeting Kalyan)
2012 मधील युतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीनंतर भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तब्बल नऊ महिने महाराष्ट्रभर फिरून कार्यकर्त्यांना जोडले. त्याच्या परिणामी शिवसेना आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते निवडून आले. कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळेच आपण दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो, असे त्यांनी नमूद केले.






