राज्यातील राजकीय समीकरणं बदलणार! राज- उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला घणाघाती हल्ला

On: December 24, 2025 1:01 PM
Shivsena MNS Alliance
---Advertisement---

Shivsena MNS Alliance | गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर जाहीर झाली आहे. बुधवारी मुंबईतील वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे ( Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संयुक्तपणे मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीची घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबईसह आगामी महानगरपालिका निवडणुकांचे राजकारण पूर्णपणे तापले असून राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

या पत्रकार परिषदपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर बाळासाहेबांचे दोन्ही सुपुत्र एकत्र आल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

राज ठाकरे काय म्हणाले? :

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी शिवसेना-मनसे युतीची औपचारिक घोषणा करत महाराष्ट्र सर्वात मोठा असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या भूमिकेतूनच ही युती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जागावाटपाबाबत सध्या कोणतीही माहिती दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर टोलेबाजी केली. योग्य वेळी उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्या भाषणात राजकीय पक्षांतील फोडाफोडीवर सूचक भाष्य करण्यात आले. काही राजकीय शक्ती पक्षांमधील कार्यकर्ते फोडण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे केला. मात्र शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते सजग असून ही युती महाराष्ट्राच्या हितासाठी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Shivsena MNS Alliance | उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात :

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. भाजपला मुंबईचे लचके तोडायचे असल्याचा आरोप करत, जर आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही ही युती कर्तव्य म्हणून केली असून एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच, असे ठामपणे त्यांनी सांगितले.

मुंबई आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. मराठी माणसाला उद्देशून बोलताना त्यांनी मराठी अस्मितेचा वसा जपूया, असे आवाहन केले. या घोषणेमुळे 2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे युती विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

News Title: Raj Thackeray and Uddhav Thackeray Announce Shiv Sena MNS Alliance Ahead of BMC Elections

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now