“नकोच ते राजकारण”; दिलीप वळसे पाटलांच्या मुलीची पोस्ट चर्चेत

On: December 1, 2024 11:26 AM
Purva Walse Patil
---Advertisement---

आंबेगाव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वा वळसे पाटील (Purva Walse Patil) सध्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीवर भाष्य करत विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे.

साहेबांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात त्यांनी आजवर विरोधकांबद्दल कधीही वाईट शब्द काढला नाही, राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली परंतु त्यांच्याबद्दल देखील कोणीही कधी वाईट बोलले नाही. आपल्या सर्वांना माहीतच आहे की, काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक दुर्दैवी अपघात झाला. एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ते या दुखापतीतून जिद्दीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही संपूर्ण कुटुंब या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्यावर झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेमुळे त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली असते. थोड्याच दिवसात ते या संकटावर सुद्धा मात करून नक्कीच पूर्वीसारखे व्हावेत अशी आम्ही रोज परमेश्वराकडे प्रार्थना करतो. परंतु काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या आभार मेळाव्यात त्यांच्या प्रकृती बद्दल बोलताना “लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल, असे अभद्र वक्तव्य केले गेले. हे ऐकल्यानंतर काय बोलावे मला सुचत नाही. काही दिवसांपूर्वी वळसे पाटील साहेबांचा फोटो ज्यांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात लावला होता तेच आज साहेबांच्या अंताची प्रार्थना करत आहेत?, असं पूर्वा वळसे पाटील (Purva Walse Patil) यांनी म्हटलंय.

तुम्ही नक्की निवडणुका लढा, जिंका, त्यात हरकत असण्याचे काही कारण नाही परंतु या सर्व गोष्टी करत असताना उन्माद किती असावा? सत्ता मिळवण्याच्या नादात आपण किती खालच्या पातळीला जात आहोत? शत्रुत्व करण्याच्या नादात आपण कोणतीच मर्यादा ठेवली नाही का? सुसंस्कृतपणाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या तालुक्यातील राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय का? तालुक्यात पस्तीस वर्षे जनतेची अविरत सेवा केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल असे बोलताना आपली जीभ जराही कचरली नाही का?, असा सवाल त्यांनी केलाय.

ज्या आदरणीय साहेबांनी आम्हाला कुटुंब म्हणून नेहमी कमी वेळ दिला परंतु या तालुक्यातील जनतेसाठी ते अहोरात्र उपलब्ध राहिले त्यांच्या मरणाची वाट पाहेपर्यंत काही लोकांची या तालुक्यात मजल गेली आहे का? आणि त्याच जोरावर काही लोक आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत का?, असंही त्या म्हणाल्यात.

भविष्यात यांच्यासारख्याच लोकांना आपला सुसंस्कृत तालुका आपले प्रतिनिधी म्हणून स्वीकारणार आहे का? ज्यांनी तुम्हाला मोठे केले घडवले त्यांच्याबद्दल तुमच्या मनात असे विचार आहेत का? कृतघ्नपनाचा कळस गाठलेल्या या लोकांसाठी राजकारण आणि निवडणुका हेच सर्वस्व आहे का? एखाद्या आजारी व्यक्तीची तुम्ही मरणाची कामना करणार का? माणूस आणि माणुसकीला काहीच किंमत उरली नाही का? अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटून आले आहे. असे काही ऐकून त्यावर उत्तर देण्यापेक्षा मला नकोच ते राजकारण असे वाटू लागले आहे, अशी पोस्ट त्यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबई व ठाण्यात ‘इतके’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

जनतेचा कौल 5 महिन्यांत बदलला, आम्ही काय करणार?

2100 रुपये मिळणार की नाही?; इथे करा नवी लिस्ट चेक

आयकर विभागाची मोठी कारवाई, डोळे फिरवणारी रोकड लागली हाताला

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now