पुणेकरांनो पाणी जपून वापरा! १८ डिसेंबरला शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार

On: December 17, 2025 1:01 PM
Pune Water Cut
---Advertisement---

Pune Water News | पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची आणि तितकीच काळजी घेण्याची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत अत्यावश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे गुरुवारी, 18 डिसेंबर रोजी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना संपूर्ण दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार असून, महापालिकेने आधीच पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. (Pune water supply shutdown)

महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत काही महत्त्वाच्या स्थापत्य घटकांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांमुळे केवळ गुरुवारीच नव्हे तर शुक्रवारी, 19 डिसेंबर रोजी देखील पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने सुरू होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पुणेकरांना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे.

कोणत्या भागांत पूर्ण दिवस पाणी बंद? :

या नियोजित पाणीपुरवठा बंदचा सर्वाधिक फटका शहराच्या पूर्व आणि उत्तर-पूर्व भागांना बसणार आहे. येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, कल्याणीनगर, धानोरी, कलवड, प्रतिकनगरचा काही भाग, कस्तुरबा वसाहत, मोहवाडी आणि जाधवनगर या परिसरांमध्ये गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Pune Water News)

या भागांतील रहिवासी, व्यापारी आस्थापने, शाळा, रुग्णालये आणि इतर संस्थांना पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना आधीच आवश्यक तेवढी पाणीसाठवणूक करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पिण्याचे पाणी, स्वयंपाक आणि अत्यावश्यक गरजांसाठीच पाण्याचा वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune Water News | शुक्रवारी पाणी येईल पण कमी दाबाने :

महापालिकेच्या माहितीनुसार, देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर काम करणार आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला जाईल. मात्र, शुक्रवारी सकाळच्या वेळेत पाणीपुरवठा सुरू होण्यास विलंब होऊ शकतो आणि काही भागांत पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता आहे. (Pune water supply shutdown)

अधीक्षक अभियंता लप्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी शुक्रवारीही पाण्याच्या वापराबाबत खबरदारी घ्यावी. अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वापरल्यास काही भागांत पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोन दिवस नियोजनबद्ध पाणी वापर केल्यास गैरसोय टाळता येईल, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

News Title: Pune Water Supply Shutdown on Thursday, Several Areas to Face Full-Day Water Cut

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now