Pune-Nagar Road l पुणे ते संभाजीनगर (Sambhajinagar) मार्गाचा भाग असलेल्या पुणे ते शिरूर (Shirur) या ५३ किमीच्या उन्नत मार्गाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) (MSRDC) हाती घेतले आहे. यासाठी डिझाइन फायनान्स बिल्ड ऑपरेट ॲण्ड ट्रान्सफर (Design Finance Build Operate and Transfer) (डीएफबीओटी) या मॉडेलवर सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा मार्ग उभारला जाणार आहे. या कामासाठी एमएसआरडीसीने स्वारस्य निविदा मागविल्या आहेत.
प्रकल्पाचा तपशील काय? :
पुणे ते शिरूर प्रकल्पामुळे पुण्यातील नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. यासाठी मागितलेल्या निविदांना एमएसआयडीसीने (MSIDC) मुदतवाढ दिली असून, २८ फेब्रुवारी शेवटची मुदत आहे.
राज्य सरकारने पुणे ते संभाजीनगर एनएच ७५३ एफ महामार्गाचा सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे ते शिरूर असा ५३ किमी लांबीचा उन्नत मार्ग आणि पुढे अहिल्यानगर ते देवगड रस्त्याची सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हे काम एमएसआरडीसीकडून केले जाणार आहे.
Pune-Nagar Road l शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्ग :
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर असा नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्याचाही एमएसआरडीसीचा प्रस्ताव आहे. पुणे ते संभाजीनगर हा संपूर्ण महामार्ग २५० किमीचा असेल. त्यामध्ये पुणे ते शिरूर हा सध्याच्या अस्तित्वातील रस्त्यावर उन्नत मार्गाचा समावेश असेल.
या प्रकल्पासाठी सुमारे २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची जोडणी शेंद्रा एमआयडीसी भागात समृद्धी महामार्गाला (Samruddhi Mahamarg) दिली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.






