Pune Shirur Flyover | महाराष्ट्रातील सर्वात गर्दीच ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे- अहिल्यानगर रोड संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. पुणे ते शिरूरदरम्यान तब्बल ५४ किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल महामार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. निविदांची दरपत्रके अंदाजे ४६ टक्के जास्त दराने आल्याने हे काम आता डीबीएफओटी (Design-Build-Finance-Operate-Transfer) पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Shirur Flyover)
येरवडा ते खराडी (Yerwada – Kharadi) हा मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत असून या रस्त्यावर वर्षानुवर्षे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सहापदरीकरण आणि ठिकठिकाणी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या सूचना नुकत्याच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या होत्या. या निर्णयाला आता अधिकृत रूप मिळाले असून रस्त्याचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
उड्डाणपुलासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडे प्रकल्प :
पुणे-शिरूर (Pune Shirur Flyover) उड्डाणपूलाचा प्रकल्प एनएचएआय किंवा एमएसआरडीसीऐवजी थेट महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाद्वारे राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने पूर्वीच घेतला होता. या प्रकल्पासाठी महामंडळाने मागविलेल्या निविदांना सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर या उड्डाणपुलासोबतच पुणे, छत्रपती संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचा समावेश करून सुमारे ४,५०० कोटींच्या अंदाजपत्रकावर निविदा मागविण्यात आल्या आहेत.
तसेच तीन कंपन्यांनी या निविदांना प्रतिसाद देखील दिला आहे. मात्र सर्व निविदा अंदाजपत्रकापेक्षा जवळपास ४६ टक्के महाग आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने प्रकल्प डीबीएफओटी पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला असून त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. ही पद्धत वापरल्यास शासनाचा प्रारंभिक खर्च कमी होऊन प्रकल्प उभारणीस गती मिळणार आहे.
Pune Shirur Flyover | ६,८४० कोटींचा खर्च; टोल वसुलीस ३० वर्षांची मुदत :
उड्डाणपुलाच्या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ६,८४० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे बंधन कंत्राटदार कंपनीवर असेल. काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीला पुढील ३० वर्षे टोल वसुलीचा अधिकार देण्यात येणार आहे.
टोल उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा कंपनीला तर उर्वरित ५० टक्के महामंडळाला मिळणार आहे. तसेच अपेक्षेपेक्षा जास्त टोल महसूल मिळाल्यास अतिरिक्त उत्पन्नातील ७५ टक्के रक्कम महामंडळाला हस्तांतरित करावी लागणार आहे, अशी अटही ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, अहिल्यानगर – पुणे (Ahilyanagar – Pune Traffic) मार्गावर दररोज अनेक वाहनांची वर्दळ असते आणि त्यामुळे खंडित वाहतूक, कोंडी, अपघात या समस्या नागरिकांना सतत भेडसावत असतात. या पार्श्वभूमीवर पुणे-शिरूर सहापदरी उड्डाणपूल मार्ग हा प्रकल्प वास्तवात आल्यानंतर संपूर्ण मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
तसेच चार वर्षांत उड्डाणपूल पूर्ण झाला तर पुणेकरांसह नगरहून पुण्याकडे येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि नगर रोडवरील कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






