पुणे रिंग रोड कामाची डेडलाइन जाहीर; कधीपर्यंत पूर्ण होणार प्रकल्प? महत्वाची माहिती आली समोर

On: December 16, 2025 2:40 PM
Pune Ring Road
---Advertisement---

Pune Ring Road | पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेला पुणे रिंग रोड प्रकल्प आता निर्णायक टप्प्यात पोहोचताना दिसत आहे. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत राज्य सरकारने अखेर स्पष्ट डेडलाइन जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. (Talegaon Chakan Highway)

याचबरोबर औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गही चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून, अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचा प्रश्न गंभीर :

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला. हा मार्ग चाकण (Chakan) व तळेगाव एमआयडीसीसाठी (Talegaon MIDC) जीवनवाहिनी मानला जातो. दररोज हजारो कामगार, उद्योजक आणि मालवाहतूक करणारी वाहने या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील खड्डे, अरुंद पट्टे आणि प्रचंड वाहतूक यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या महामार्गासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर निश्चित करण्यात आली असून, त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश निघण्यासाठी किमान तीन महिने लागणार आहेत. प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी अपेक्षित असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. तोपर्यंत नागरिकांनी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा त्रास सहन करायचा का, असा सवाल उपस्थित करत आमदार शेळके यांनी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.

Pune Ring Road | पुणे रिंग रोड प्रकल्पाला सरकारची स्पष्ट वेळमर्यादा :

या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली. पुणे रिंग रोडच्या पश्चिम विभागातील कामे मे 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, पूर्व विभागातील कामे 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अंतर्गत वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी होईल, असेही त्यांनी सांगितले. (Pune Ring Road)

दरम्यान, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या बाबतीत निविदा प्रक्रिया सुरू असताना तात्पुरत्या उपाययोजना करता येतील का, याची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही मंत्री भुसे यांनी दिले. या चर्चेमुळे मावळ, चाकण, शिक्रापूरसह संपूर्ण पुणे महानगर परिसरातील उद्योग आणि नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, लवकरच ठोस दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

News Title: Pune Ring Road and Talegaon–Chakan–Shikrapur Highway Deadline Announced, Know Completion Timeline

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now