Harshvardhan Sapkal Statement | पुण्यात काँग्रेस भवनाबाहेर उसळलेल्या तणावानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरून पेटलेल्या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. या प्रकरणात सुमारे १०० ते १५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. (Harshvardhan Sapkal Statement)
वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आणि हिंसक आंदोलन :
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या एका विधानानंतर पुण्यात राजकीय वातावरण तापले. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने रविवारी काँग्रेस भवनासमोर आंदोलन छेडले. दुपारच्या सुमारास भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही तेथे जमल्याने दोन्ही गट आमनेसामने आले आणि वातावरण चिघळले.
शाब्दिक चकमकीनंतर परिस्थिती हाताबाहेर जात दगडफेक सुरू झाली. अचानक वाढलेल्या तणावामुळे परिसरात धावपळ उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
Harshvardhan Sapkal Statement | दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे :
या प्रकरणात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आणि इतर ५० ते ६० कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणणे व बेकायदेशीर जमाव जमवणे यांसारख्या आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Harshvardhan Sapkal Statement)
त्याचप्रमाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), कसबा मतदारसंघाचे उपाध्यक्ष गौरव बाळंदे, अक्षय जैन, सागर धाडवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवरही तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली आहे. एकूण १०० ते १५० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.






