पुणे: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील हिंजवडी (Hinjewadi) परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत थायलंडच्या (Thailand) चार महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी एका विदेशी दलाल महिलेला अटक करण्यात आली असून तिला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सोशल मीडियावरून ग्राहकांना आमिष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांना जास्त पैशांचे आमिष दाखवून पुण्यात आणण्यात आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना या तरुणींचे फोटो पाठवले जात होते. लोणावळ्यात (Lonavala) व्हिला बुक करून या परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता.
गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. कारवाई दरम्यान थायलंडच्या चार महिलांची सुटका करण्यात आली असून दलाल महिलेकडून २० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
बीडमध्येही वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा
या प्रकारासोबतच बीड (Beed) जिल्ह्यातही अशाच स्वरूपाचा वेश्या व्यवसाय उघडकीस आला आहे. शिवाजीनगर (Shivajinagar) पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरी महिलांना बोलवून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
याबाबत पोलिसांनी तातडीने कारवाई करत बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून बीड जिल्ह्यातील तीन आणि पुणे जिल्ह्यातील एक महिला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






