Pune News | पुण्याच्या दौंड तालुक्यातील बोरावके नगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एकाच वेळी सहा ते सात भ्रूण आणि मानवी शरीराचे अवशेष सापडल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. (Pune News)
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सीलबंद बरण्यांत सापडले भ्रूण
दौंड (Daund) शहरालगत असलेल्या प्राईम टाऊनच्या मागे असलेल्या खुल्या मैदानात मोठ्या प्रमाणावर टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये हे भ्रूण आणि अवशेष सापडले. स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांच्या 112 हेल्पलाईनवर दिल्यानंतर दौंड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पाहणी अंती कचऱ्यातून काही सीलबंद बरण्या आढळल्या, ज्यामध्ये मानवी भ्रूण आणि अवशेष होते.
या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून तात्काळ एक वैद्यकीय पथक बोलावलं. हे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या बरण्यांवर 2020 सालाचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या नमुन्यांवर कोणतीही प्रयोगशाळा, संस्था किंवा रुग्णालयाचा उल्लेख असल्यास, ते कोणाकडून येथे टाकले गेले याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.
प्रयोगशाळेतील नमुने की बेकायदेशीर गर्भपात?
प्रथमदर्शनी या अवशेषांबाबत प्रयोगशाळेतील नमुने असावेत असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी पोलिसांनी यामागे बेकायदेशीर गर्भपाताचा संशय नाकारलेला नाही. याच कारणामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने करत आहेत. हे नमुने टाकणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मानवी अवशेष आणि भ्रूण अशा प्रकारे उघड्यावर टाकणं हे केवळ अनैतिक नव्हे तर कायद्याने गुन्हा आहे. (Pune News)
दौंड पोलीस (Daund Police) सध्या वैद्यकीय अहवालांची प्रतीक्षा करत असून, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हे नमुने कोठून आले, कुणी टाकले, आणि त्यामागे कोणती संस्था किंवा व्यक्ती आहे याचा शोध लावण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे.
Title : Pune News Fetuses Found in Garbage in Daund






