Pune Municipal Election | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत वाढताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती प्रत्यक्षात न झाल्याने अनेक प्रभागांमध्ये थेट लढती उभ्या राहिल्या आहेत. या राजकीय घडामोडींमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेली लढत म्हणजे धंगेकर विरुद्ध बिडकर सामना होय. 2017 च्या निवडणुकीची आठवण करून देणारी ही लढत यंदा पुन्हा चर्चेत आली आहे.
माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे कुटुंब पुन्हा एकदा निवडणूक रणांगणात उतरले असून, यामुळे पुण्यातील मध्यवर्ती भागातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. शिवसेनेच्या वतीने धंगेकर कुटुंबीय रिंगणात असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचं चित्र दिसत आहे.
प्रभाग 23 आणि 24 मध्ये थेट लढत :
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये धंगेकर कुटुंबीयांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 23 मधून, तर सुपुत्र प्रणव धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 24 मधून निवडणूक अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट सामना होणार आहे.
विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 24 मध्ये प्रणव धंगेकर यांची थेट लढत भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्याशी होणार आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. यंदा मात्र बिडकर यांच्यासमोर धंगेकर यांचा मुलगा असल्याने ही लढत अधिक लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे 2017 ची पुनरावृत्ती होणार की भाजप बदला घेणार, याकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलं आहे.
Pune Municipal Election | युती-आघाड्या कागदावरच, मैदानात मैत्रीपूर्ण लढती :
पुणे महापालिकेच्या (Pune Mahapalika Election) 165 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत विविध पक्षांमधील युती-आघाड्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात जागावाटपाबाबत स्पष्टता नसल्याने अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती उभ्या राहिल्या आहेत. (Dhangekar vs Bidkar)
भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेतील युतीही पुण्यात प्रत्यक्षात उतरलेली नाही. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी गट आमनेसामने आले आहेत. राजकीय समीकरणांचा गोंधळ आणि बंडखोरीची शक्यता यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक अधिक चुरशीची होत चालली आहे.
धंगेकर विरुद्ध बिडकर ही लढत केवळ एका प्रभागापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण पुणे शहरातील राजकीय वातावरणावर प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता आहे. निकालातून कोण बाजी मारणार, याचा निर्णय मात्र 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.






