Manmad Pune Railway Line | महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष ठरणाऱ्या मनमाड-पुणे रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत आहेत. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
रेल्वे प्रवास हा खिशाला परवडणारा आणि देशभरात सहज उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रेल्वेवर अवलंबून आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे ते मनमाड हा अतिशय वर्दळीचा आणि महत्त्वाचा रेल्वे मार्ग अधिक सक्षम करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना वेळेची बचत होणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मोठा फायदा होणार आहे. (Manmad Pune Railway Line)
पुणे-मनमाड मार्गावर नवे, मजबूत रूळ :
पुणे-मनमाड रेल्वे मार्गावर सध्या उच्च दर्जाचे नवे रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. हे नवे रूळ तब्बल 550 जीएमटी म्हणजेच सुमारे 55 कोटी टन वजन सहन करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होणार असून अवजड मालगाड्यांमुळे रुळांवर येणारा ताणही कमी होणार आहे.
सध्या पुणे विभागातील पुणतांबा ते कन्हेगाव रेल्वे स्थानकादरम्यान हे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे वाहतूक पूर्णतः बंद न करता ठराविक कालावधीसाठी ब्लॉक घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर फारसा परिणाम न होता प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे.
Manmad Pune Railway Line | रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार :
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात ‘पीक्यूआरएस’ म्हणजेच प्लेसर क्विक रिलेइंग सिस्टीम या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अवघ्या एका महिन्यात प्रशासनाने या मार्गावरील सुमारे नऊ किलोमीटर लांबीचे रूळ बदलले आहेत. याआधी 52 किलो वजनाचे रूळ वापरण्यात येत होते, मात्र आता त्यांच्या जागी 60 किलो वजनाचे अधिक मजबूत आणि टिकाऊ रूळ बसवले जात आहेत. (Manmad Pune Railway Line)
या नव्या रुळांमुळे पुणे-मनमाड मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे. सध्या या मार्गावर गाड्या 110 किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा वेग 130 किलोमीटर प्रतितासपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अल्ट्रासोनिक टेस्टिंगसारख्या आधुनिक तपासणी पद्धतींमुळे रुळांमधील सूक्ष्म दोष वेळीच ओळखता येणार असून मोठे अपघात टाळणे शक्य होणार आहे. (Pune Railway News)
या प्रकल्पाचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर पुढील 15 ते 20 वर्षे पुन्हा रूळ बदलण्याची गरज भासणार नसल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा मोठा लाभ मिळणार आहे.






