Pune Real Estate | पुणे शहर गेल्या दहा वर्षांत वेगाने वाढले असून रोजगार, शिक्षण, आयटी पार्क, औद्योगिक पट्टे व नव्या टाउनशिप्समुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. मात्र वाहतूककोंडी, असंघटित विस्तार व एकसंध विकासाचा अभाव यामुळे पुण्याच्या वाढीला अडथळे येत होते. अशा परिस्थितीत राज्य सरकारचे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) धोरण पुणे महानगरासाठी निर्णायक पाऊल ठरत आहे.
टीओडीमुळे मेट्रो मार्गांलगत उच्च एफएसआयनुसार उंच प्रकल्पांची वाढ होत असून जागेचा कार्यक्षम वापर वाढला आहे. त्यामुळे निवासी उपलब्धता वाढत असून किमतींना अनाठायी उसळी न देता स्थिरता मिळत आहे. पुण्यात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारामुळे पुढील काळात अनेक परिसरातील घरांच्या व जागेच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो, असे रिअल इस्टेट तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. (Pune Real Estate)
मेट्रोमुळे परिसरांची जीवनशैली बदलते; मागणीत स्थिर वाढ :
टीओडी धोरण (TOD policy) लागू झाल्यानंतर मेट्रो मार्गालगतच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनिष जैन यांच्या मते, ज्या परिसरात मेट्रो स्टेशनची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी मालमत्तांचे दर तुलनेने स्थिर राहतात. अशा भागांत खरेदीदारांना कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा मिळतो, त्यामुळे मागणीही स्थिर राहते.
मेट्रो स्टेशनच्या परिसरात स्वच्छ फूटपाथ, छोटे दुकाने, उद्याने, कार्यालये, शाळा आणि आरोग्य सुविधा झपाट्याने विकसित होत आहेत. त्यामुळे हे परिसर ‘स्वयंपूर्ण पट्टे’ बनू लागले आहेत. नागरिकांचा प्रवास खर्च, वेळ आणि मानसिक ताण कमी होत असून शहरी जीवनशैली अधिक सुसह्य बनली आहे. त्यामुळे भविष्यात किमती पोहोचण्याजोग्या राहतील की नाही, हा प्रश्न गौण ठरू लागला आहे, कारण स्थिरतेचा हा नमुना नागरिकांमध्ये दीर्घकालीन आत्मविश्वास निर्माण करतो.
Pune Real Estate | रिअल इस्टेटसाठी शाश्वत पाया; पुण्यातील अनेक भागांमध्ये बदल जाणवतो :
टीओडी धोरणामुळे (TOD polic) बांधकाम क्षेत्रातील स्पर्धा अधिक आरोग्यदायी बनली आहे. उच्च एफएसआयमुळे प्रकल्प महाग न होता अधिक स्मार्ट, कॉम्पॅक्ट आणि वास्तववादी होत आहेत. विकसकांसाठी गुंतवणूक सुलभ झाली असून खरेदीदारांसाठी भविष्यकालीन मूल्यवृद्धीची खात्री मजबूत होत आहे. पिंपरी-चिंचवड, कोथरूड, बावधन, वाकड, बाणेर-बालेवाडी, रामवाडी, कासारवाडी आणि नाशिक फाटा या परिसरात हा बदल स्पष्टपणे जाणवतो.
ज्या परिसरात मेट्रो स्टेशन्सची घनता जास्त आहे, तिथे बाजारात स्थिरता दिसत आहे. खात्रीशीर कनेक्टिव्हिटीमुळे अनाठायी महागाई किंवा अनियमित किंमतवाढ न होता निवासी बाजार संतुलित राहतो. पुणे स्टेशन-केंद्रित विकासामुळे शहरात नियोजन आधारित किंमतव्यवस्था आकार घेत आहे आणि ही परिस्थिती दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनुकूल ठरते आहे.






