Pune Metro Phase 2 | पुणेकरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर पुणे मेट्रो फेज-2 प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा आमूलाग्र बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मंजुरीमुळे पुणे मेट्रो नेटवर्क 100 किमीच्या पुढे जाऊन देशातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक म्हणून पुण्याच्या पायाभूत सुविधांना बळ मिळणार आहे. (Pune Metro Phase 2)
पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri- Chinchwad) झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढता वाहनभार आणि कोंडीला उपाय म्हणून या प्रकल्पाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात होते. अखेर केंद्र सरकारने फेज-2 मार्गास मंजुरी देताच शहरभरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
फेज-2 मधील नवीन मार्ग कोणते? :
पुणे मेट्रो फेज-2 मध्ये दोन प्रमुख मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण 31.636 किमी लांबीच्या या मार्गांवर 28 एलिव्हेटेड स्टेशन उभारली जाणार आहेत. पहिला मार्ग म्हणजे लाईन 4 – खराडी, हडपसर, स्वारगेट मार्गे थेट खडकवासला. हा मार्ग पूर्व-पश्चिम जोडणी मजबूत करणार असून IT पार्क, औद्योगिक पट्टे आणि मुख्य बस टर्मिनल्स थेट एकमेकांशी जोडले जाणार आहेत.
दुसरा मार्ग म्हणजे लाइन 4A – नळस्टॉप ते वॉरजे मार्गे माणिक बाग. कर्वे रोड, वॉरजे आणि सिंहगड रोड (Singhgad Road) परिसरासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दोन्ही मार्गांच्या विकासासाठी तब्बल ₹9,857.85 कोटी खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी केंद्र, राज्य आणि बाह्य निधी संस्था मिळून सहकार्य करणार आहेत.
पुणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार :
फेज-2 मुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा आहे. सोलापूर रोड, मगरीपट्टा रोड, कर्वे रोड, सिंहगड रोड, कोथरूड आणि वॉरजे परिसरात मेट्रोच्या अभावामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनभार वाढतो. आता हे सर्व मार्ग थेट मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार असून नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे. (Pune Metro Phase 2)
मेट्रोच्या या नवीन फेजमुळे शहरातील सध्याच्या लाईन 1 आणि लाईन 2 शी थेट जोडणी तयार होणार आहे. त्यामुळे मल्टिमोडल नेटवर्क — म्हणजेच बस, रेल्वे आणि मेट्रो यांच्यातील कनेक्टिव्हिटी आणखी सुलभ होईल. पुढील काळात या मार्गांचा लोणी काळभोर आणि सासवड पर्यंत विस्तार करण्याचीही शक्यता आहे.
प्रवासी संख्या दुप्पटीने वाढणार :
येत्या काही वर्षांत पुणे मेट्रोचा (Pune Metro) प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 2028 पर्यंत दररोज 4.09 लाख, 2038 पर्यंत 7 लाख, तर 2048 मध्ये 9.63 लाख प्रवासी मेट्रोचा वापर करतील. 2058 पर्यंत ही संख्या 11.7 लाखांवर जाईल अशी अपेक्षा आहे. यापैकी खराडी–खडकवासला (Kharadi- Khadakwasla metro line) मार्गावर सर्वाधिक प्रवासीभार असेल.
सध्या महामेट्रोकडून सर्व्हे, डिझाइन आणि संबंधित प्राथमिक कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नागरी, यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि सिस्टिम कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून प्रकल्पाची अंमलबजावणी 5 वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.






