Pune Crime | पुणे शहराची शांत आणि सांस्कृतिक ओळख काही वर्षांत गुन्हेगारीच्या सावटाखाली झाकोळली जाताना दिसत आहे. शहरातील टोळक्यांची वाढती दहशत, गँगवॉर आणि सलग होणाऱ्या हिंसक घटना यामुळे नागरिकांच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. विशेषतः कोयता गँगच्या कारवायांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही काळ शांत राहिल्यानंतर ही गँग पुन्हा एकदा सक्रिय झाली असल्याचे संकेत मिळत असून त्यांची ताजी कारवाई शहराला हादरवून टाकणारी आहे. (Koyta Gang Attacks)
मंगळवारी मध्यरात्री एरंडवणे परिसरात घडलेली घटना याचे ताजे उदाहरण आहे. रात्री दीडच्या सुमारास अनंत रेस्टोबारमध्ये चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवल्याने सर्वत्र भीती आणि गोंधळ निर्माण झाला. या टोळक्यांच्या हातात कोयते आणि दांडके होते. त्यांनी परिसरात दहशत माजवत रेस्टोबारमध्ये तोडफोड केली आणि उपस्थित ग्राहकांना धमकावले. अचानक झालेल्या हल्ल्याने बारमधील लोक हादरून गेले.
कोयता दाखवत रोख रक्कम लंपास; पोलिसांचे रात्रीपासून तपासकार्य सुरू :
या गुंडांनी रेस्टोबारमध्ये घुसताच शस्त्रांचा धाक दाखवत रोख रक्कम लांबवली. नेमकी किती रक्कम चोरीला गेली आहे, याबद्दल पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. डेक्कन पोलीस ठाण्याचे (Deccab Police Station)अधिकारी सकाळपासून घटनास्थळाची पाहणी करत संपूर्ण माहिती गोळा करत आहेत. संबंधित टोळक्यांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास सुरू असून लवकरच संपूर्ण खुलासा करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या नाकावर टिच्चून अशा घटना पुण्यासारख्या महानगरात घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. शहरात वाढलेल्या टोळक्यांच्या धुमाकुळामुळे व्यवसायिकही अस्वस्थ झाले आहेत. रात्री व्यवसाय करणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेक हॉटेल-बार मालकांना पडू लागला आहे.
Pune Crime | CCTV मध्ये संपूर्ण घटना कैद; ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण :
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना स्पष्ट दिसते. एक व्यक्ती सर्वप्रथम रेस्टोबारमध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या मागोमाग इतर चार साथीदार घुसतात. सर्वांनी कोयते हातात घेतलेले दिसत आहेत. आत गेल्यानंतर त्यांनी अचानक शस्त्रे बाहेर काढत उपस्थित ग्राहकांना धमकावणे सुरू केले. ग्राहक भीतीने थरथरत असल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसते. (Koyta Gang Attacks)
तोडफोड, धमक्या आणि दहशतीचे वातावरण निर्माण करत या गुंडांनी काही मिनिटांत रक्कम लंपास केली आणि तेथून पसार झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ग्राहक हादरले असून अनेकांना बाहेर पडायलाही भीती वाटत आहे. बार किंवा रेस्टोबारमध्ये जाणे सुरक्षित आहे का, असा प्रश्नही अनेक पुणेकरांच्या चर्चेत आहे.






