Pune Camp Traffic Changes | नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. खरेदीसाठी दरवर्षी हजारो नागरिक कॅम्प भागात दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांची सुरक्षितता राखण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी तात्पुरते वाहतूक बदल जाहीर केले आहेत. हे बदल 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत लागू राहणार आहेत. (Pune Camp Traffic Changes)
महात्मा गांधी रस्ता आणि परिसरातील गल्ल्यांमध्ये खाद्यपदार्थ, सजावटीच्या वस्तू आणि भेटवस्तूंची दुकाने असल्यामुळे नाताळच्या आदल्या दिवशी आणि नाताळच्या दिवशी येथे मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
कॅम्प परिसरात कोणते रस्ते बंद राहणार? :
गोळीबार मैदानाकडून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद ठेवण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूकही तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. तसेच व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. (Christmas Traffic Diversion)
याशिवाय इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार असून, सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांवरही निर्बंध असणार आहेत. गर्दीच्या काळात या मार्गांवर वाहतूक पूर्णतः वळवण्यात येणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Pune Camp Traffic Changes | पर्यायी मार्ग आणि पोलिसांचे आवाहन :
वाहतूक वळवण्यासाठी 15 ऑगस्ट चौकातून कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाच्या दिशेने वाहनांना सोडण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौक परिसरातील वाहतूक एसबीआय हाउस चौकातून लष्कर पोलिस ठाण्याच्या दिशेने वळवण्यात येईल. व्होल्गा चौकाकडील वाहने ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येणार आहेत. (Pune Camp Traffic Changes)
नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर कॅम्प आणि आसपासच्या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पथके तैनात करण्यात येणार आहेत. आपत्कालीन सेवांना या वाहतूक बदलांमधून सूट देण्यात आली असून नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






