Pune Election News | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच भाजपला महत्त्वाचे यश मिळाले आहे. पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, त्यामुळे निवडणूकपूर्व वातावरणात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Pune Election News)
प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी-माणिकबाग परिसरातून भाजपच्या मंजुषा नागपुरे, तर प्रभाग ३५ ड या सर्वसाधारण जागेतून श्रीकांत जगताप (Shrikant Jagtap) हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे हा निकाल स्पष्ट झाला.
प्रभाग ३५ मध्ये अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट :
प्रभाग क्रमांक ३५ मध्ये सुरुवातीला एकूण सहा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज छाननीदरम्यान बाद ठरले, तर उर्वरित तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) या बिनविरोध निवडून आल्या. या निकालानंतर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला.
दुसरीकडे, प्रभाग ३५ ड या सर्वसाधारण जागेसाठी नितीन गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे श्रीकांत जगताप यांचा मार्ग मोकळा झाला. परिणामी, निवडणुकीपूर्वीच भाजपने पुण्यात दोन जागांवर विजय निश्चित केला आहे.
Pune Election News | पुण्यात चौरंगी लढतीचे चित्र, सर्व पक्ष सज्ज :
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत (Pune mahapalika election) यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदे गटाची शिवसेना आणि काँग्रेस-ठाकरे गटाची शिवसेना अशी सरळसरळ लढत होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पुण्याची सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, पुण्यातील राजकारणात आणखी हालचाली घडत असून, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ४० जागांवर तुतारी चिन्हावर उमेदवार रिंगणात असणार आहेत. भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना स्वबळावर, तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पुण्यातील महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.






