Pune ATS Raid | दिल्ली बॉम्बस्फोटानंतर (Delhi Blast) संपूर्ण देशात खळबळ उडाली असून, प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशातच आता पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) छापेमारी केली आहे. या कारवाईत एका व्यक्तीची सखोल चौकशी करण्यात येत असून, त्याचे दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Pune ATS Raid)
कोंढवा परिसरात ATS ची छापेमारी, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त :
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा (Kondhwa) भागात दहशतवादी विरोधी पथकाने बुधवारी सकाळी मोठी कारवाई केली. या दरम्यान एका व्यक्तीच्या घराची झडती घेण्यात आली असून, लॅपटॉप, हार्डडिस्क आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
तपास यंत्रणांकडून त्या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. सध्या त्याला अटक करण्यात आलेली नसली तरी त्याच्या संपर्कातील लोकांची सुद्धा माहिती गोळा केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही कारवाई दिल्ली स्फोटाशी संबंधित तपासाचा भाग असल्याचे मानले जात आहे.
Pune ATS Raid | जुबेर हंगरगेकरशी संबंधाचा संशय, फॉरेन्सिक तपास सुरू :
तपास यंत्रणांनी जप्त केलेली सर्व उपकरणे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्तीचे नेमके कोणाशी संपर्क होते, याचा खुलासा होईल. प्राथमिक तपासात या व्यक्तीचा जुबेर हंगरगेकरच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून ही छापेमारी अत्यंत गुप्तपणे करण्यात आली असून, परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मात्र नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.
मुंब्रा येथेही छापा, शिक्षकाच्या घरातून मोबाईल आणि उपकरणे जप्त :
याआधी ATS ने मुंब्रा (ठाणे) येथील कौसा विभागात राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरावर छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. संबंधित शिक्षक हा ‘जमात-ए-इस्लाम’ संघटनेशी जोडलेला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. (Pune ATS Raid)
दिल्लीतील स्फोटानंतर संपूर्ण देशात व्हाईट कॉलर मॉड्यूल सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील प्रमुख रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
पुण्यातील छापेमारीमुळे या प्रकरणाला आणखी वेग आला असून, तपास यंत्रणा आता साखळी स्वरूपातील दहशतवादी जाळ्याचा मागोवा घेत आहेत.






