Municipal Council Election | पुणे जिल्ह्यात होणाऱ्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदारांना मतदानाचा हक्क सहजपणे बजावता यावा, यासाठी 20 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी वेळ उपलब्ध होणार असून, मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. (Pune District Elections)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. नगरपरिषद निवडणुकांच्या दिवशी कोणत्याही मतदाराला कामाच्या कारणामुळे मतदानापासून वंचित राहावे लागू नये, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 20 डिसेंबर रोजी संबंधित भागांमध्ये सर्वसाधारण सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.
‘या’ नगरपरिषदांसाठी 20 डिसेंबरला सुट्टी :
प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगरपरिषदांच्या हद्दीत 20 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे. या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका याच दिवशी पार पडणार असून, या निर्णयाचा थेट लाभ लाखो मतदारांना होणार आहे. (Municipal Council Election)
या सार्वजनिक सुट्टीमुळे संबंधित मतदारसंघातील मतदारांना मतदान केंद्रांवर जाणे सुलभ होणार आहे. तसेच, प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना त्यांच्या नियंत्रणाखालील शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे आणि मंडळांना याबाबत स्पष्ट सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी कोणत्याही स्तरावर गोंधळ होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
Municipal Council Election | बँका, कार्यालये आणि बाहेर असलेल्या मतदारांनाही लागू :
ही सार्वजनिक सुट्टी केवळ स्थानिक कार्यालयांपुरती मर्यादित नसून, केंद्र शासनाची शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच बँकांनाही लागू राहणार आहे. त्यामुळे कामानिमित्त व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी मोकळा वेळ मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. (Public Holiday)
विशेष म्हणजे, मतदारसंघाच्या हद्दीत राहणारे तसेच कामानिमित्त त्या-त्या मतदारसंघाबाहेर असलेले मतदार यांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर किंवा इतर तालुक्यांत काम करणाऱ्या मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, नगरपरिषद निवडणुकीत प्रत्येकाने न चुकता मतदान करावे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा.






