Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा दिवसांपासून तापमानाचा मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. दिवसा कमाल तापमान ३० अंशांपर्यंत पोहोचत असून, रात्री अचानक पारा ११ ते १३ अंशांवर घसरत आहे. या तीव्र बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर काही प्रमाणात परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला आणि श्वसन विकारांची तक्रार वाढत चालली आहे.
महापालिकेच्या YCM रुग्णालयासह नवीन थेरगाव, तालेरा, यमुनानगर, जिजामाता आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये दररोज या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. खासगी दवाखान्यांच्या ओपीडीमध्येही रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, डॉक्टरांनी हवामानातील बदलांमुळे संसर्गाचा धोका वाढल्याचे स्पष्ट केले आहे. (Pimpri Chinchwad viral infection)
हवेची गुणवत्ता ढासळली; प्रदूषणामुळे श्वसनाचा धोका वाढला :
शहरातील रस्त्यावरील धूळ, बांधकामांवरील कण, वाहनांचा धूर आणि आरएमसी प्लांटमधून होणारे प्रदूषण यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सतत खराब होत आहे. गेल्या दहा दिवसांत एअर क्वालिटी १६१ ते २२४ पर्यंत नोंदली गेली आहे. १५१ ते २०० एएक्यूआय आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो, तर २०१ ते ३०० या श्रेणीत हवा आणखी धोकादायक बनते.
दमा, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, गर्भवती महिला तसेच पाच वर्षांखालील मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा काळ सर्वात जास्त धोक्याचा असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे गरम पाणी पिणे, उबदार कपडे वापरणे आणि प्रदूषित ठिकाणी शक्यतो जाणे टाळणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Pimpri Chinchwad | जाणून घ्या लक्षणे :
नागरिकांमध्ये सतत नाक वाहणे किंवा बंद नाक, कोरडा खोकला किंवा कफासह खोकला (cold cough cases), घशात खवखव, बोलताना त्रास, डोके जड होणे, अंगदुखी, १०० ते १०२ अंशांपर्यंत ताप, थकवा, भूक मंदावणे अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. लहान मुलांमध्ये कानदुखी, सतत रडणे आणि प्रौढांमध्ये श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत वेदना अशा समस्या वाढल्या आहेत. अशी कोणतीही लक्षणे जाणवल्यास घरच्या घरी उपचार करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. (PCMC hospitals)
डॉक्टरांचा सल्ला न घेता वारंवार अँटिबायोटिक्स घेणे, थंड पेये किंवा आईस्क्रीम खाणे, सिगारेटचा धूर, आगीचा धूर आणि गर्दीत विनामास्क फिरणे यामुळे त्रास वाढू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी शहरात कोणतीही साथ नसून हवामानातील बदलामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे सांगितले आहे.






