Onion Export Duty | भारत सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला असून, हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून अंमलात येणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या कांद्याचे दर काय आहेत आणि उत्पादनाबाबत काय अंदाज आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (Onion Export Duty)
कांद्यावरील निर्यात शुल्क हटवलं
यापूर्वी कांद्यावर 20 टक्के निर्यात शुल्क आणि किमान निर्यात किंमत (MEP) लागू होती, तसेच डिसेंबर 2023 ते मे 2024 दरम्यान कांद्याच्या निर्यातीवर बंदी होती. देशांतर्गत बाजारात पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतला होता. मात्र आता महसूल विभागाने 1 एप्रिलपासून हे शुल्क हटवण्याची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे शेतकरी व निर्यातदारांना मोठा दिलासा मिळेल.
सध्या कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजारात दर घसरले आहेत. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव बाजारात कांद्याचा दर 1330 रुपये प्रति क्विंटल, तर पिंपळगावमध्ये 1325 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवण्यात आला. यामागचं कारण म्हणजे रब्बी हंगामातील भरघोस उत्पादन. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, रब्बी हंगामात 227 लाख मेट्रिक टन कांद्याचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 18% अधिक आहे.
शेतकऱ्यांना मिळणार फायदा
2023-24 या आर्थिक वर्षात भारताने 17.17 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केली होती. 2024-25 मध्ये 11.65 लाख मेट्रिक टन निर्यातीचा अंदाज आहे. सप्टेंबर 2024 मध्ये 0.72 LMT एवढी मासिक निर्यात झाली होती, तर जानेवारी 2025 मध्ये ती 1.85 LMT वर पोहोचली. आता निर्यात शुल्क हटवण्यात आल्यामुळे हा आकडा आणखी वाढेल आणि शेतकऱ्यांना जागतिक बाजारात चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. (Onion Export Duty)
शेतकऱ्यांना रास्त भाव देतानाच ग्राहकांवरही महागाईचा ताण येऊ नये, हा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या किरकोळ कांदा दरात 10% आणि घाऊक दरात 39% घट झाली आहे, त्यामुळे बाजार स्थिर आहे. आगामी काळात खरीप कांद्याची आवक सुरू होईपर्यंत रब्बी कांद्याच्या पुरवठ्यामुळे बाजारात दर स्थिर राहतील.
Title : Onion Export Duty Removed from April 1






