मी मरून जाईन म्हणत रवींद्र वायकर मातोश्रीवर येऊन रडलेले; राऊतांच्या पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट

On: May 16, 2025 11:02 AM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना UBTचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी शिवसेना UBTचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजकीय वर्तुळातील अनेक गौप्यस्फोट केले आहेत, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या गौप्यस्फोटांमध्ये राऊतांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबतही अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ईडीच्या अटकेच्या भीतीने रवींद्र वायकर आणि त्यांचे कुटुंब मातोश्रीवर येऊन रडले, असा दावा राऊतांनी केला आहे. “जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरून जाईन किंवा मला आत्महत्या करावी लागेल,” अशी विनवणी वायकरांनी उद्धव ठाकरेंकडे केली, असेही राऊतांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने दबाव टाकल्याने आणि भीतीने वायकरांनी पक्ष सोडला, असा दावाही राऊतांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केला आहे.

पुस्तकातील काही दावे:

वायकर शिंदे गटात गेले त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावर हा दबाव होता. वायकर शिवसेनेच्या निष्ठावान आमदारांपैकी एक होते, असे या पुस्तकात म्हटले आहे.

रवींद्र वायकर (Ravindra waykar)  यांच्या अनेक कौटुंबिक सोहळ्यांत ठाकरे कुटुंबाचा सहभाग असे. जोगेश्वरीत ते ‘सुप्रीमो’ नावाचा क्लब चालवत होते, जो प्रत्यक्षात महापालिकेच्या जागेवर होता आणि तिथे अनेक लग्नसोहळे पार पडत, असेही राऊतांनी पुस्तकात नमूद केले आहे.

वायकर कसे अडकत गेले याविषयी सांगताना राऊतांनी किरीट सोमय्या यांचा उल्लेख केला आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचानक वायकर यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील जमिनींच्या तुकड्यांवर नऊ बंगले बांधल्याचे खोटे चित्र उभे केले आणि हे बंगले ठाकरे कुटुंबाचे आहेत, असे भासवले. या प्रकरणी खोट्या गुन्ह्यांची नोंद झाल्याचे त्यांनी उघडकीस आणले.

Sanjay Raut |राजकीय वर्तुळात खळबळ : 

‘सुप्रीमो’च्या जमिनीबाबत नोंदी बदलल्याचा आरोप करून पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला आणि पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेत वायकरांचा तपास सुरू केला. याच गुन्ह्याचा आधार घेत ईडीने प्रवेश केला, असा दावाही राऊतांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

रवींद्र वायकर (Ravindra Waykar) यांना ईडी अटक करणार, असा धुरळा किरीट सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबाची गाळण उडाली, असेही राऊतांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे. राऊतांनी केलेल्या या गौप्यस्फोटांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

News Title: “No Strength to Go to Jail, I Will Die…” Raut’s Big Claim in “Heaven in Hell” Book

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now