लातूर-कल्याण एक्सप्रेस महामार्गात मोठा फेरबदल! ‘या’ जिल्ह्याला होणार सर्वाधिक फायदा

On: December 23, 2025 3:08 PM
Latur–Kalyan Highway
---Advertisement---

Latur–Kalyan Highway | अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून लातूर आणि कल्याण या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या जनकल्याण एक्सप्रेस हायवेमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. विशेष म्हणजे, या महामार्गाच्या प्रस्तावित मार्गात बदल करण्याची मागणी पुढे आल्याने अहिल्यानगरसह धाराशिव जिल्ह्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. (Latur–Kalyan Highway)

महाराष्ट्र विधानमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारकडून या नव्या महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. शक्तिपीठ महामार्गाच्या रूटमध्ये बदल करतानाच लातूर ते कल्याण असा स्वतंत्र जनकल्याण महामार्ग उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

बारा तासांचा प्रवास अवघ्या पाच तासांत :

राज्य सरकारच्या मते, या प्रस्तावित लातूर-कल्याण महामार्गामुळे सध्या तब्बल 12 तास लागणारा प्रवास अवघ्या 5 तासांवर येणार आहे. यामुळे मराठवाडा आणि मुंबई महानगर प्रदेश यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, व्यापारी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, या महामार्ग प्रकल्पात परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचा बदल सुचवला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून प्रस्तावित मार्गात सुधारणा करण्याची आग्रही मागणी केली आहे.

Latur–Kalyan Highway | महामार्गाच्या रूटमध्ये काय बदल सुचवला? :

सध्या प्रस्तावित लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गाचा मार्ग हा लातूर – अंबाजोगाई – केज – बीड – जामखेड – अहिल्यानगर – कल्याण असा आहे.

मात्र, प्रताप सरनाईक यांनी तांत्रिक व व्यवहार्य दृष्टीने सुधारणा करत हा मार्ग लातूर – कळंब – पारा – ईट – खर्डा – जामखेड – अहिल्यानगर – कल्याण असा असावा, अशी सूचना केली आहे. (Latur–Kalyan Highway Route)

या बदलामुळे प्रवासाचे अंतर तब्बल 60 ते 70 किलोमीटरने कमी होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. अंतर कमी झाल्यास प्रवासाचा कालावधी आणि प्रकल्पाचा खर्च दोन्ही कमी होण्याची शक्यता आहे.

धाराशिवसह अहिल्यानगर जिल्ह्याला विकासाची संधी :

जर प्रस्तावित महामार्गात धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याचा समावेश झाला, तर या भागातील शेती व शेतीपूरक व्यवसायाला मोठा हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांचे कृषी उत्पादन थेट मुंबई आणि ठाणे महानगर प्रदेशात जलदगतीने पोहोचवता येणार असून, यामुळे बाजारपेठ उपलब्ध होईल आणि उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

यासोबतच, अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणारा हा नवा एक्सप्रेस हायवे औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकासासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

News Title : New Express Highway to Pass Through Ahilyanagar District? Major Change Proposed in Latur–Kalyan Highway Route

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now