Aadhaar App | भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून देशातील कोट्यवधी आधारधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी आधार कार्डसाठीचे नवीन, फुल व्हर्जन मोबाईल अॅप अधिकृतपणे लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅपमुळे आधारशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवा आता अधिक सोप्या, जलद आणि सुरक्षित पद्धतीने मोबाईलवरूनच उपलब्ध होणार आहेत.
आतापर्यंत आधार कार्डवरील मोबाईल नंबर, पत्ता किंवा इतर माहिती अपडेट करण्यासाठी नागरिकांना आधार सेवा केंद्रांमध्ये जावे लागत होते. मात्र, UIDAI च्या या नवीन डिजिटल उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या स्मार्टफोनवरूनच ही कामे करता येणार आहेत. UIDAI ने सोशल मीडियावरून या अॅपच्या लॉन्चची अधिकृत माहिती दिली आहे.
मोबाईल नंबर, पत्ता अपडेटची सोपी प्रक्रिया :
या नवीन आधार अॅपमधून मोबाईल नंबर अपडेट करणे किंवा पत्ता बदलणे अतिशय सोपे होणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे थेट अॅपमध्ये अपलोड करता येणार असून, आधार केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च दोन्ही वाचणार असून प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. (Aadhaar Mobile Number Change)
UIDAI च्या माहितीनुसार, या अॅपमध्ये ओटीपी-आधारित लॉगइन प्रणाली असणार आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांचा डेटा अधिक सुरक्षित राहणार आहे. आधारशी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवून लॉगइन करता येईल. लॉगइन केल्यानंतर वापरकर्ते आपला आधार तपासू शकतील, डिजिटल स्वरूपात शेअर करू शकतील तसेच विविध सरकारी व खासगी सेवांसाठी त्याचा वापर करू शकतील.
Aadhaar App | Masked Aadhaar सुविधा; प्रायव्हसीला बळ :
या अॅपमधील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे Masked Aadhaar सुविधा. यामध्ये आधार क्रमांकातील काही अंक लपवून केवळ आवश्यक तपशीलच शेअर करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहणार असून डेटा गोपनीयतेला अधिक बळ मिळणार आहे.
तसेच, या अॅपमुळे नागरिकांना आधार कार्ड किंवा त्याची छायाप्रत कायमस्वरूपी सोबत बाळगण्याची गरज राहणार नाही. मोबाईलमध्ये डिजिटल स्वरूपात आधार उपलब्ध राहील आणि आवश्यक ठिकाणी ओळख सिद्ध करण्यासाठी त्याचा वापर करता येईल. सध्या काही मर्यादित सुविधा उपलब्ध होत्या, मात्र 28 जानेवारीपासून अॅपमधील सर्व फीचर्स पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. (Aadhaar App)
हे नवीन आधार अॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. UIDAI चे हे पाऊल ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला मोठे बळ देणारे असून, आधारशी संबंधित कामे आता काही मिनिटांत, सुरक्षितपणे आणि घरबसल्या पूर्ण करणे शक्य होणार आहे.






