NCP Ward 9 | प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राबवण्यात आलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेणारा प्रगती अहवाल आणि नागरिकांच्या अपेक्षांवर आधारित पुढील वाटचालीचा ‘जनहितनामा’ अधिकृतपणे प्रकाशित होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दस्तऐवज विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या कार्यकाळात प्रभागात नेमकी कोणती कामे झाली, कोणत्या समस्या सोडवण्यात आल्या आणि भविष्यात कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे, याचा स्पष्ट आराखडा नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभागातील राजकीय वातावरणातही यामुळे चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या हस्ते जनहितनाम्याचे प्रकाशन :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते हा प्रगती अहवाल आणि जनहितनामा प्रकाशित केला जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक ९ मधील चारही उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर उपस्थित राहणार आहेत.
या प्रगती अहवालात प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा, वाहतूक नियोजन, स्वच्छता मोहिमा, स्मार्ट सुविधा, नागरिक सेवा केंद्रे, आरोग्यसेवा तसेच सार्वजनिक पायाभूत सुविधां संदर्भातील कामांचा सविस्तर आणि व्यवस्थित आढावा देण्यात आला आहे. यासोबतच प्रभागाच्या भविष्यातील गरजा आणि विकासाचे प्राधान्यक्रमही स्पष्ट करण्यात आले आहेत.
NCP Ward 9 | जनतेच्या सहभागातून तयार झालेला आराखडा :
या जनहितनाम्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे जनतेच्या सहभागातून तयार करण्यात आला आहे. प्रभागातील पाच हजारहून अधिक नागरिकांची मते, रहिवासी संस्था, नागरिक संघटना तसेच विविध सिटिझन ग्रुप्सकडून आलेल्या सूचना, तक्रारी आणि अपेक्षा नोंदवूनच हा दस्तऐवज साकारण्यात आला आहे.
नागरिकांनी ज्या मुद्द्यांवर प्रत्यक्ष बदल अपेक्षित केला आहे, ज्या समस्या रोजच्या जीवनावर परिणाम करत आहेत आणि ज्या बाबींमधून थेट नागरिकांना लाभ होऊ शकतो, त्या सर्व गोष्टींना या जनहितनाम्यात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रगती अहवाल आणि जनहितनामा प्रभाग ९ मधील प्रत्येक नागरिकासाठी दिशादर्शक, पारदर्शक आणि बांधिलकी दर्शवणारा दस्तऐवज ठरणार आहे.






