Jayant Patil Statement | अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मोठा खुलासा करत निवडणूक आयोगाशीही याबाबत चर्चा झाली होती, असं सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाशीही चर्चा झाली होती :
जयंत पाटील (Jayant Patil Statement) यांनी सांगितलं की, अजित पवार, शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि इतर नेत्यांसोबत विलिनीकरणावर बैठक झाली होती आणि सुनील तटकरे यांनाही बोलावण्यात आलं होतं. त्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सर्वांची सहमती होती. मात्र निवडणूक आयोगाकडून सतत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणा होत राहिल्यामुळे हा निर्णय पुढे ढकलावा लागला, असं त्यांनी स्पष्ट केलं.
जयंत पाटील (Jayant Patil Statement)म्हणाले की, “त्या काळात निवडणूक आयोगातील एका अधिकाऱ्याशी माझं बोलणं झालं होतं. आम्हाला विलिनीकरणासाठी चार दिवसांचा वेळ द्यावा आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका जाहीर कराव्यात, अशी विनंती आम्ही केली होती. मात्र ती मान्य झाली नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया थांबली.”
Jayant Patil Statement | जिल्हा परिषद निवडणुकांनंतर घोषणा ठरली होती :
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकांनंतर विलिनीकरणाची अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय झाला होता. शरद पवार यांच्या निवासस्थानी पुन्हा बैठक झाली होती आणि 8 किंवा 12 तारखेला घोषणा करण्याचं ठरलं होतं. मात्र काही कारणांमुळे ती वेळ येण्याआधीच परिस्थिती बदलली आणि प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही.
या खुलाशानंतर आता अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर चर्चा तीव्र झाली असून, पुढील काही दिवसांत राजकीय गोटातून मोठ्या हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






