Nanded News | नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने गावात भीती, दुःख आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या कुटुंबातील दोन तरुण मुलांनी रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवलं, तर त्यांचे आई-वडील घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
घटनेची माहिती समजताच गावात मोठी खळबळ उडाली. सकाळपासूनच जवळा गावात नागरिकांची गर्दी उसळली होती. एकाच कुटुंबातील चौघांचा अशा पद्धतीने अंत झाल्याने कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. ही आत्महत्या आहे की यामागे काही वेगळं कारण आहे, याबाबत सध्या कुणालाही ठोस उत्तर मिळालेलं नाही.
नेमकं काय घडलं? पोलिसांचा तपास सुरू :
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात राहणाऱ्या लखे कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. बजरंग रमेश लखे (वय २२) आणि उमेश रमेश लखे (वय २५) या दोन सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दुसरीकडे, त्याच कुटुंबातील वडील रमेश होनाजी लखे (वय ५१) आणि आई राधाबाई रमेश लखे (वय ४४) हे दोघेही त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. एकाच वेळी घडलेल्या या घटनांमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मृतदेह सापडताच पोलिसांनी घर आणि परिसर सील करून पंचनामा केला.
Nanded News | राजकीय व सामाजिक वर्तुळातही हळहळ :
मृत उमेश लखे हा मनसेचा मुदखेड (Mudkhed) तालुक्याचा माजी उपाध्यक्ष होता, अशी माहिती समोर आली आहे. तो सामाजिक कार्यातही सक्रिय होता, त्यामुळे त्याच्या मृत्यूने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे. लखे कुटुंबाचा कोणाशी वाद होता का, आर्थिक अडचणी होत्या का, की कौटुंबिक तणावातून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. (Nanded Crime News)
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. आत्महत्या की घातपात, या प्रश्नाचं उत्तर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.






