Election | महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नगर विकास विभागाच्या सुधारित आदेशांनुसार, मुंबई, ठाणे आणि पुणे महानगरपालिका निवडणुका आता दिवाळीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील विविध महापालिका आणि नगरपरिषदांच्या प्रभाग रचना प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेला 6 ऑक्टोबरपर्यंत, ‘ड’ वर्ग महापालिकांना 13 ऑक्टोबरपर्यंत, आणि नगरपरिषदांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता निवडणुकांचा ‘बार’ दिवाळीनंतरच वाजणार आहे.
निवडणुकांपूर्वी सुधारित प्रभाग रचना अनिवार्य :
6 मे रोजी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पुन्हा वेळ मागण्यात आला आहे.
नगर विकास विभागाने 23 जून रोजी सुधारित जीआर जाहीर करत नवीन वेळापत्रक सादर केले. त्यामुळे निवडणुकांची तयारी करणाऱ्या राजकीय पक्षांना आणखी काही महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही मोर्चेबांधणीसाठी अधिक वेळ मिळाला आहे.
Election | पुणे, ठाणे आणि इतर महापालिकांनाही विलंब :
फक्त मुंबईच नव्हे तर पुणे, ठाणे आणि राज्यातील सर्वच महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उशीर होणार आहे. प्रभाग रचना पूर्ण करण्यासाठी वाढीव कालावधी मिळाल्यामुळे, या सर्व निवडणुका आता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकांची उत्सुकता वाढली आहे. या निवडणुकांमध्ये अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.






