BMC | मुंबई (Mumbai) शहर अधिक स्वच्छ आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) या प्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाला दंड वाढवण्यासह नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
थुंकणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश :
मुंबईतील रस्ते, फूटपाथ आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वाढत्या अस्वच्छतेवर सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. उघड्यावर थुंकण्याच्या सवयीवर तीव्र शब्दांत टीका करत न्यायालयाने हा प्रकार थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांना सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि कचरा टाकणाऱ्यांवरील दंड थेट 2 हजार रुपये करण्याचा विचार करण्याचे निर्देश दिले.
याशिवाय प्रत्येक प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी संबंधित वॉर्ड अधिकारी (Ward Officers) यांच्यावर निश्चित करण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ज्या वॉर्डमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा किंवा घाण आढळेल, त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
BMC | सीसीटीव्हीद्वारे अंमलबजावणीवर भर :
सुनावणीदरम्यान न्यायालयाने देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूर (Indore) शहराचा आदर्श समोर ठेवला. मुंबई महापालिकेकडे पुरेशी आर्थिक क्षमता आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असल्याने इच्छाशक्ती असेल तर शहर स्वच्छ ठेवणे अवघड नाही, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल सखारे (Anil Sakhare) यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘बीएमसी महानगरपालिका घनकचरा स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपविधी, 2025’ संपूर्ण शहरात कठोरपणे लागू करण्याची तयारी सुरू आहे. सध्या उघड्यावर थुंकल्यास 250 रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र, तो वाढवून 2 हजार रुपये करण्याचा न्यायालयाने सल्ला दिला आहे. तसेच केवळ नियम बनवून न थांबता सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रभावी कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.






